भारतीय वाहिन्या दाखविणाऱ्या ५० पाकिस्तानी केबलवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 11:39 AM2023-04-28T11:39:32+5:302023-04-28T11:40:07+5:30

सॅटेलाइट रिसिव्हरसह अनेक उपकरणे जप्त

Action taken against 50 Pakistani cables showing Indian channels | भारतीय वाहिन्या दाखविणाऱ्या ५० पाकिस्तानी केबलवर कारवाई

भारतीय वाहिन्या दाखविणाऱ्या ५० पाकिस्तानी केबलवर कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लाहोर : भारतीय वाहिन्यांचे कार्यक्रम दाखविणाऱ्या ५०हून अधिक पाकिस्तानी केबलचालकांची उपकरणे पाकिस्तान इलेक्शन मीडिया रेग्युलेटरी ऑथॉरिटी (पीईएमआरए) या यंत्रणेने जप्त केली आहेत. लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, कराची आदी सात शहरांतील केबलचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

भारतीय वाहिन्यांचे कार्यक्रम पाकिस्तानात दाखविण्यावर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने  घातलेल्या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पीईएमआरएने काही दिवसांपूर्वी दिला होता. मात्र, त्या आदेशाला काही केबलचालक जुमानत नव्हते. केबलचालकांकडून जप्त करण्यात आलेल्या उपकरणांमध्ये १४ सॅटेलाइट रिसिव्हर, ११ मोड्युलेटर, ५ ट्रान्समीटर, दोन डिजिटल बॉक्सेसचा समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणाऱ्या केबलचालकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अजूनही जे केबलचालक भारतीय वाहिन्यांचे कार्यक्रम अवैधरित्या प्रसारित करत असतील त्यांनी ते तातडीने थांबवावेत असा इशारा पीईएमआरएने दिला आहे. (वृत्तसंस्था)

१९६५ साली भारतीय चित्रपटांवर होती बंदी
पाकिस्तानने याआधी अनेकदा भारतीय वाहिन्यांचे कार्यक्रम, चित्रपट यांच्या प्रसारणावर बंदी घातली होती. १९६५ साली भारत-पाकिस्तान युद्ध झाले. त्यानंतर पाकिस्तानात भारतीय चित्रपट दाखविण्यावर निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र, २००८ सालानंतर ही बंदी मागे घेण्यात आली. त्यानंतर काश्मीर प्रश्नावरून तणाव वाढल्याने पुन्हा ही बंदी घालण्यात आली. लाहोर उच्च न्यायालयाने या आदेशाविरोधात दिलेला निकाल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१८मध्ये रद्दबातल केला.


 

Web Title: Action taken against 50 Pakistani cables showing Indian channels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.