दिल्ली पोलिसांची कारवाई, असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 12:45 PM2022-06-09T12:45:38+5:302022-06-09T12:46:54+5:30
वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नवी दिल्ली : भडकाऊ वक्तव्ये आणि सोशल मीडियावर द्वेषयुक्त संदेश पसरवल्याप्रकरणी दिल्लीपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी यती नरसिंहानंद यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषणे दिल्याबद्दल एफआयआर नोंदवला आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह 9 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, द्वेषपूर्ण वक्तव्ये करुन वातावरण बिघडवणाऱ्यांवर दिल्ली पोलिसांची कडक कारवाई सुरूच राहणार आहे. नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर कठोर कारवाई केल्यानंतर आता असदुद्दीन ओवेसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषयुक्त संदेश पसरवणे, खोट्या आणि पुष्टी नसलेल्या बातम्या पसरवणे, धार्मिक सलोखा बिघडवणे आणि इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारीदेखील दिल्ली पोलिसांनी काही लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. त्यांच्यावरही द्वेषयुक्त संदेश पसरवणे, वेगवेगळ्या गटांना भडकवने, शांतता आणि सुव्यवस्था बिघडू शकते अशी परिस्थिती निर्माण करणे, असे आरोप आहेत. विशेष सेलच्या 'इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन' (IFSO) युनिटने नोंदवलेल्या एफआयआरमध्ये नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्यासह नऊ जणांची नावे आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
वाद कसा सुरू झाला
ज्ञानवापी मशिदीच्या आवारात सापडलेल्या कथित शिवलिंगासंदर्भात एका टीव्ही चर्चेदरम्यान नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्यावर कथितपणे वादग्रस्त टिप्पणी केली होती. नुपूर शर्माच्या या कथित वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली, ज्यावर दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. नुपूर शर्माला तिच्या कथित विधानामुळे पक्षातून निलंबित करण्यात आले आणि दिल्ली भाजपचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांना वादग्रस्त ट्विट केल्याबद्दल पक्षातून काढून टाकण्यात आले.