यूपीतल्या आयपीएस दर्जाच्या अधिका-यानं राम मंदिर बनवण्याची घेतली शपथ, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 16:45 IST2018-02-02T16:39:02+5:302018-02-02T16:45:13+5:30
उत्तर प्रदेशमधले डीजी होमगार्ड सूर्यकुमार शुक्ला यांनी राममंदिर निर्माणाचा भर मंचावर संकल्प केला आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत.

यूपीतल्या आयपीएस दर्जाच्या अधिका-यानं राम मंदिर बनवण्याची घेतली शपथ, व्हिडीओ व्हायरल
लखनऊः उत्तर प्रदेशमधले डीजी होमगार्ड सूर्यकुमार शुक्ला यांनी राममंदिर निर्माणाचा भर मंचावर संकल्प केला आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहेत. गुरुवारी लखनऊमध्ये आयोजित केलेल्या सभेत त्यांनी राम मंदिर निर्माणाची शपथ घेतली. त्यासंदर्भातील त्यांच्या सभेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओवर जोरदार आक्षेप घेत काँग्रेसनं योगी सरकारकडे डीजी होमगार्ड यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यानं डीजी सार्वजनिक वाच्यता करू शकतात, असंही वकील केटीएस तुलसी म्हणाले आहेत.
विरोधकांनी डीजींच्या विधानाला जोरदार आक्षेप घेत विरोध प्रदर्शनही केलं आहे. त्यामुळे योगी सरकारनंही डीजी होमगार्ड सूर्यकुमार शुक्ला यांच्याकडून खुलासा मागवला आहे. त्यानंतर डीजीनंही या प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे फोनवरून स्पष्टीकरण दिलं आहे. डीजी म्हणाले, कार्यक्रमाला जाण्यापूर्वी मी अशी कोणतीही शपथ घेईन, असं ठरवलं नव्हतं. मी फक्त कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी गेलो होतो. मी कोणतंही भाषण दिलं नाही किंवा कोणतीही वादग्रस्त विधानं केली नाहीत. तर डीजींबरोबर इतरही काही मुस्लिम नेत्यांनी राम मंदिर निर्माणाची शपथ घेतली आहे. हा कार्यक्रम 28 जानेवारी 2018 रोजी लखनऊ विश्वविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राममंदिर आणि हिंदूसंबंधित अनेक गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या मंचावर खुद्द डीजी होमगार्ड सूर्यकुमार उपस्थित होते. डीजीपीच्या शर्यतीत असलेले सूर्यकुमार शुक्ला हे 1982 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. डीजीच्या पदावर असतानाही राम मंदिर बनवण्याची शपथ घेणं हे सरकारी सेवेच्या विरुद्ध आहे. तसेच डीजी असताना कोणत्याही सामाजिक किंवा राजनैतिक मुद्द्यावर व्यक्त होणं योग्य नसल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे. त्यामुळे डीजींच्या या विधानानं योगी सरकार पुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.