व्हॉटसअॅप ग्रुपवरील आक्षेपार्ह पोस्टसाठी ग्रुप अॅडमिनवर होणार कारवाई
By admin | Published: April 21, 2017 12:19 PM2017-04-21T12:19:04+5:302017-04-21T12:25:09+5:30
सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास यापुढे थेट ग्रुप अॅडमिनवर कारवाई होईल.
Next
ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. 21 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीमध्ये यापुढे सोशल मीडियाचा संभाळून वापर करावा लागणार आहे. वाराणसीमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर केल्यास यापुढे थेट ग्रुप अॅडमिनवर कारवाई होईल. फेसबुक, व्हॉटसअॅपवरुन आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हिडीओ आणि अफवा पसरवल्यास ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरुन थेट तुरुंगात रवानगी करण्यात येईल. सोशल मीडियाचा वाढता गैरवापर कमी करण्यासाठी वाराणसीतील स्थानिक प्रशासनाने हे आदेश दिले आहेत.
वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ असून मोदी स्वत: सोशल मीडियावर सक्रीय असतात. फेसबुक, व्हॉटस अॅपवरुन व्हायरल होणा-या आक्षेपार्ह फोटो, व्हिडीओमुळे अनेकदा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होते, तणाव वाढतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडियावर पोस्ट केलेली माहिती चुकीची, दिशाभूल करणारी असेल तर, ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल केला जाईल असे जिल्हा न्यायदंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी संयुक्तपणे जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
ग्रुपमधील अन्य सदस्यांनी टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टसाठी ग्रुप अॅडमिनला जबाबदार धरता येणार नाही असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने डिसेंबर महिन्यात दिला होता.