ट्रेन उशिरानं सुटल्यास अधिका-यांवर होणार कारवाई- सुरेश प्रभू
By admin | Published: April 18, 2017 06:18 PM2017-04-18T18:18:49+5:302017-04-18T18:18:49+5:30
ट्रेनला सुटण्यासाठी उशीर झाल्यास अधिका-यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच सुरेश प्रभूंनी केले आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - गेल्या काही दिवसांपासून ट्रेन उशिरानं सुटण्याचे प्रकार वाढत आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे अनेक प्रवाशांनी ट्रेनच्या अनियमित वेळापत्रकासंदर्भात वारंवार तक्रारी आणि नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर ट्रेनला सुटण्यासाठी उशीर झाल्यास अधिका-यांवर कारवाई करण्याचे सूतोवाच सुरेश प्रभूंनी केले आहेत.
ट्रेन वेळेत सोडा अन्यथा कारवाईसाठी तयार राहा, असा सल्लावजा इशाराच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अधिका-यांना दिला आहे. प्रभूंच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी रेल्वेच्या विभागीय प्रमुखांनी रात्री 10 ते सकाळी 7 या वेळेत वरिष्ठ पातळीवरील अधिका-यांची नेमणूक करत कामाची वेळ ठरवून दिली आहे. रात्रीच्या वेळेस एखाद्या ट्रेनला उशीर होत असल्यास संबंधित परिस्थितीवर नजर ठेवत वरिष्ठ पातळीवरील अधिका-यांनी ती ट्रेन वेळेत सुटेल, याची काळजी घ्यावी, असंही विभागीय प्रमुख म्हणाले आहेत.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर राष्ट्रीय रेल्वे चौकशी प्रणाली(एनटीईएस)नं उशिरा सुटणा-या रेल्वेच्या टाकलेल्या वेळापत्रकाची रेल्वेमंत्री स्वतः दखल घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांना वेळेत ट्रेन सुटण्याचा अनुभव घेता येत आहे. 1 एप्रिल 2017 ते 16 एप्रिल 2017 या कालावधीत अनेक ट्रेन्सचे वेळपत्रक 79 टक्के विस्कळीत झाल्याचं समोर आलं आहे. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत याच कालावधीत 84 टक्के ट्रेनच्या वेळपत्रकात बिघाड झाला होता. मात्र हे प्रमाण काही प्रमाणात घसल्याचंही समोर आलं आहे.