हिंदू कट्टरपंथीय दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय- कमल हासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 01:12 PM2017-11-02T13:12:57+5:302017-11-02T13:14:41+5:30
अभिनय क्षेत्रानंतर राजकारणात प्रवेश करण्याच्या मार्गावर असणारे अभिनेते कमल हासन यांनी एका साप्ताहिकात लेख लिहिला आहे.
नवी दिल्ली- अभिनय क्षेत्रानंतर राजकारणात प्रवेश करण्याच्या मार्गावर असणारे अभिनेते कमल हासन यांनी एका साप्ताहिकात लेख लिहिला आहे. हिंदू दहशतवादावर भाष्य करणारा लेख लिहून कमल हासन यांनी खळबळ उडवून दिली आहे. 'उजव्या विचारसरणीच्या लोकांनी बळाचा वापर करायला सुरुवात केली आहे. हे लोक हिंसाचारात सहभागी असून हिंदुत्ववादी संघटनांमध्ये दहशतवाद घुसला आहे', असा आरोप कमल हासन यांनी त्यांच्या लेखातून केला आहे.
तामिळ भाषेतील 'आनंदा विकटन' या साप्ताहिकात कमल हासन यांनी हा लेख लिहिला आहे. 'हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही, असं कोणीच म्हणणार नाही. यापूर्वी हिंदुत्ववादी चर्चा करण्यावर विश्वास ठेवायचे. पण आता ते हिंसाचारातही सहभागी होऊ लागले आहेत', असं कमल हासन यांनी म्हंटलं आहे. तसंच जनतेचा 'सत्यमेव जयते'वरील विश्वास उडाला आहे, असंही त्यांनी लेखात म्हंटलं आहे. 'तामिळनाडूच्या तुलनेत केरळ सरकारने धार्मिक हिंसाचार चांगल्या पद्धतीनं हाताळला आहे', असं म्हणत कमल हासन त्यांनी केरळ सरकारचं कौतुकही केलं आहे.
कमल हासन यांच्या या लेखावर तामिळनाडूत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही कमल हासन यांच्या या लेखावर कडक शब्दात टीका केली आहे. 'कमल हासन हे नैतिकदृष्ट्या भ्रष्ट आहेत. हिंदू दहशतवादा'चा कोणताही पुरावा नाही,' असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
भाजपाचे नेते मुरलीधरन यांनी कमल हासन यांच्या लेखावर प्रश्न उपस्थित केले आहेत. कमल हासन हे सत्यापासून तोंड फिरवत असल्याचं त्यांनी म्हंटलं. केरळमधील खरी परिस्थिती वेगळं असल्याचं त्यांनी म्हंटलं.