या अभिनेत्यावर गायिकेने केला लैंगिक शोषणाचा आरोप
By admin | Published: March 5, 2017 04:57 PM2017-03-05T16:57:34+5:302017-03-05T17:58:02+5:30
कोलावरी डी या गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेला अभिनेता धनुषवर एका गायिकेने लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - कोलावरी डी या गाण्यामुळे प्रकाश झोतात आलेला अभिनेता धनुष एका गायिकेने लैंगिक शोषण केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा जावाई असलेल्या धनुष्यच्या आडचणीत दिवसेंदिवस अडचणी वाढतचं आहेत. धनुष हा आपला हरवलेला मुलगा आहे, असा दावा एका वृद्ध दांम्पत्याने केला आहे. यामुळे धनुषला कोर्टाच्या खेटा घालाव्या लागत आहेत. त्यातच आता त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे.
कॉलिवूडमधिल प्रसिद्ध गायिका सुचित्रा कार्तिक हिने अभिनेता धनुष आणि अनिरुद्ध यांच्यावर लैंगिक शोषण करण्याचा आरोप केला आहे. हा आरोप तिने सोशल मीडियावर ट्विट करत केला आहे. धनुष आणि अनिरुद्धशिवाय अन्य मोठ्या स्टार्सवरही तिने आरोप केले आहेत. ट्विटनंतर चाहत्यांनी तिच्यावर घणाघाती टीका करत फैलावर घेतले. यानंतर सुचित्राने सर्व पोस्ट डिलीट करत आपले अकांऊट हॅक झाल्याच्या बातम्या झळकल्या.
दरम्यान, सुचित्राने धनुष आणि अनिरुद्ध यांनी मला फक्त ड्रग्सच दिले नाही, तर माझे लैंगिक शोषणही केले, असा खळबळजनक आरोप केला. या पोस्टमध्ये सुचित्राने धनुष आणि अनिरूद्धसोबतचे काही आपत्तीजनक फोटो पोस्ट केले. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर सुचित्राने ट्विटरवर एक पोस्ट टाकली. यात तिने हा गंभीर आरोप केला. धनुषच्या चाहत्यांकडून मी ट्रोल होत आहे. पण या चाहत्यांच्या हिरोने माझ्यासोबत काय केले ते पाहा, असे लिहित तिने एक फोटो पोस्ट केला.
या फोटोत सुचित्राच्या हातावर जखम दिसतेय. सुचित्राच्या हातावरची ही जखम खूप काही सांगणारी असली तरी काही वेळातच तिचा हा फोटो अन् सगळ्या पोस्ट डिलिट करण्यात आल्या. यानंतर काही वेळात सुचित्राचे अकाऊंट हॅक झाल्याची बातमी आली.मीडियाने याबाबत सुचित्राला विचारले असता, तिने मात्र अकाऊंट हॅक झाल्याचा इन्कार केला. माझे अकाऊंट हॅक वगैरे झालेले नव्हते. मी स्वत: त्या पोस्ट केल्यात, असे ती म्हणाली.
मात्र, सुचित्राच्या पतीने मात्र वेगळीच स्टोरी सांगितली. तिच्या पतीने या संपूर्ण प्रकरणाबद्दल सोशल मीडियावर माफी मागितली. शिवाय सुचित्राचे अकाऊंट खरोखरच हॅक झाले होते. ती सध्या डिप्रेशनमध्ये आहे, असे त्याने स्पष्ट केले.