अभिनेता आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 10:40 AM2017-12-14T10:40:27+5:302017-12-14T12:08:40+5:30
अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन झालं आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 54 वर्षांचे होते.
मुंबई - अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक निरज व्होरा यांचं निधन झालं आहे. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 54 वर्षांचे होते. जुहूमधील सीटी केअर रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. फिर हेरा फेरी, रंगीला, राजू बन गया जेंटलमन, अकेले हम अकेले तुम, दौड आणि मन हे त्यांचे उल्लेखनीय चित्रपट होते. आपल्या कॉमेडी भूमिकांसाठी ते विशेष ओळखले जात. 'दौड' चित्रपटात त्यांनी साकारलेला चाको आजही अनेकांच्या लक्षात आहे. दुपारी 3 वाजता सांताक्रूझमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'निरज व्होरा याचं पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास क्रिटी केअर रुग्णालयात निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते कोमामध्ये होते. फिरोज नाडियाडवाला यांच्या घरी त्यांच्यावर उपचार सुरु होते. रात्री त्यांची तब्येत खराब झाली असता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला'.
Saddened by the demise of Neeraj Vora. An energetic and creative personality, he will be remembered for his films and warm nature. My thoughts are with his family and admirers in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) December 14, 2017
गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात नीरज व्होरा यांना हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक आला होता. यानंतर त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण यावेळी ते कोमामध्ये गेल्याने, त्यांना वेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यानंतर त्यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांनी त्यांना मुंबईतील आपल्या घरी आणलं होते. फिरोज नाडियावाला हेच त्यांची सर्व काळजी घेत होते. त्यांनी नीरज यांच्यासाठी आपल्या जुहू स्थित ‘बरकत व्हिला’मधील एका खोलीचे रुपांतर आयसीयूमध्ये केले होते.
निरज व्होरा हेरा फेरीच्या तिस-या सिक्वेलसाठी तयारी करत होते. पण त्यादरम्यान हार्टअटॅक आल्याने प्रोजक्ट लांबणीवर पडला. केतन मेहता यांच्या होली (1984) चित्रपटातून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली होती. आमीर खानने त्या चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती. 2015 मध्ये आलेला 'वेलकम बॅक' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.