CoronaVirus: तबलिगी जमातच्या 'त्या' सदस्यांना परेश रावल यांचा एकच टोकदार सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 04:16 PM2020-04-13T16:16:02+5:302020-04-13T16:49:36+5:30
लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.'
नवी दिल्ली- देशात सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यापार्श्वभूमीवर आज अभिनेते आणि नेते परेश रावल यांनीही भाष्य केले. यावेळी त्यांनी अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे केलेल्या विनंतीचे समर्थन केले. तसेच तबलिगी जमातसंदर्भातही आपले मत व्यक्त केले आहे.
लॉकडाऊन वाढविण्याचे समर्थन करताना परेश रावल म्हणाले, 'नोव्हेल कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ज्या पद्धतीने वाढ होत आहे, ते पाहता, ही काळाची गरज आहे आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.' यावेळी लॉकडाऊनचे उल्लंघण करणाऱ्यांसोबत पोलीस कठोरपणे वागत असल्याच्या तक्रारींसदर्भात ते म्हणाले, 'पोलिसांनाही हे बरे वाटत नाही. मात्र, लोक परिस्थितीचे गांभीर्यच ओळखायला तयार नसतील, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावीच लागेल.'
संपूर्ण देशाने पाहिले आहे, की दिल्लीतील निजामुद्दीनमधील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये झालेल्या कार्यक्रमामुळे देशातील कोरोना व्हायरस बाधितांची संख्या किती वेगाने वाढली आहे. तेथून बाहेर पडणारे जास्तीत जास्त जमाती कोरोना पाझिटिव्ह आढळून आले आहेत. यानंतर जेव्हा त्यांना वेगवेगळ्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले, तेव्हा तेथील त्यांच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे, की जमातचे नाव घेऊन लोक या विषयाला धार्मिक विषय बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. परेश रावल यांनी एका झटक्यात या सर्व चर्चांना बाजूला सारत, 'ही केवळ कुण्या एकाधर्माची गोष्ट नाही, मिनिटा-मिनिटाला बातम्या आल्या आहेत आणि यासंदर्भात लोकांना सर्व माहित आहे. थुंकणे आणि उघड्यावर विष्ठाकरणे या गोष्टी सर्वांनाच माहीत आहे. कुणीही याचा इनकार करू शकत नाही.
परेश रावल यांनी त्यांचे म्हणणे एका सोप्या प्रश्नाने संपवले. त्यांनी विचारले, की 'मला वाटते, ज्याने आणि जेथे उल्लंघण केले आहे. त्याला प्रश्न विचारलाच जायला हवा. आपल्या देशात आत्महत्यादेखील गुन्हा आहे. त्यामुळे, जर आपण दुसऱ्याचा जीव धोक्यात टाकत असून तर त्यावर प्रश्न विचारायला नको?'