घरीच बनावट नोटा छापणाऱ्या अभिनेत्रीला अटक, ५७ लाखांचे बोगस चलन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 05:50 AM2018-07-05T05:50:48+5:302018-07-05T05:50:48+5:30
बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी पोलिसांनी मल्याळम टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रीला तिच्या आई व बहिणीसह अटक केली आहे.
इडुक्की : बनावट नोटा छापून त्या चलनात आणल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी पोलिसांनी मल्याळम टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रीला तिच्या आई व बहिणीसह अटक केली आहे. कोल्लम जिल्ह्यातील आपल्या घरीच ती व तिचे कुटुंबीय या नोटा छापण्यासाठी मदत करीत असत, असे पोलिसांना आढळून आले आहे.
सूर्या शशीकुमार असे या अभिनेत्रीचे नाव आहे. ती कोल्लम येथे राहते. तिने आपल्या बंगलेवजा घराचा पहिला मजला बनावट नोटा छापण्यासाठी दिला होता. त्यातून नोटा छापणाºयांना जो नफा होत असे, त्यातील काही टक्के रक्कम सूर्या शशीकुमार व तिच्या कुटुंबीयांना मिळत असे. त्या घरातून पोलिसांनी प्रिंटर, कम्प्युटर, बाँड पेपर तसेच छापलेल्या नोटाही हस्तगत केल्या आहेत. बनावट नोटा छापण्यासाठीचे साहित्य विकत घेण्यासाठी सूर्या शशीकुमार हिनेच स्वत:च सुमारे साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, असे पोलसांना तपासात आढळून आले आहे. या घरात केवळ ५00 रुपयांच्याच बनावट नोटा छापल्या जात, असे प्राथमिक तपासात दिसून आल्याची माहिती कोल्लम पोलिसांनी दिली.
बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाºया लष्करातील माजी सैनिकाला पोलिसांनी अटक केली होती. अन्नाकोडई भागात घातलेल्या छाप्यात पोलिसांना अडीच लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या अभिनेत्रीच्या घरावर छापा घालण्यात आला. या ठिकाणी सात कोटी रुपये मूल्याच्या बनावट नोटा छापण्याची योजना आखण्यात आली होती, असे पोलिसांना तपासात आढळले.
पोलिसांनी शशीकुमारची आई रमादेवी (वय ५६) आणि बहीण श्रुती (२९) अशा तिघांना अटक केली आहे. बनावट नोटा छापण्यासाठी या तिघींनी ज्या लोकांना आपल्या घराचा वापर करण्यासाठी दिला होता, त्यांचाही शोध आता सुरू आहे. अभिनेत्रीच्या घरातील ५७ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. (वृत्तसंस्था)
१ लाखात ३५ लाख रुपये
या प्रकरणी कृष्णकुमार व रवींद्रन नावाच्या दोन जणांना अटक झाली आहे. त्यांच्याकडे ३५ लाख रुपयांच्या नोटा सापडल्या आहेत.
या नोटा ते १ लाख रुपयांच्या खºया नोटांच्या किमतीत विकणार होते. गेले सहा महिने नोटा छापण्याचा उद्योग अभिनेत्रीच्या घरी सुरू होता, असे पोलिसांनी सांगितले.