Manoj Tiwari fined: हेल्मेट न घालता बाईकवरून केली तिरंगा रॅली; भाजपा खासदार मनोज तिवारींना दिल्ली पोलिसांनी पाठवलं २१ हजारांचं चलान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 11:49 PM2022-08-03T23:49:58+5:302022-08-03T23:51:06+5:30
'आझादी का अमृत महोत्सव' अभियानांतर्गत काढली होती तिरंगा यात्रा
Manoj Tiwari fined: दिल्लीच्यालाल किल्ला परिसरात ‘हर घर तिरंगा’ मोटारसायकल रॅलीदरम्यान हेल्मेट न घातल्याबद्दल दिल्ली वाहतूक पोलिसांनी बुधवारी भाजपा खासदार मनोज तिवारी यांना दंड ठोठवला. हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे मनोज तिवारी यांना चांगलेच महागात पडले. रॅलीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तब्बल २१ हजारांचे चलन पाठवले. हेल्मेट न वापरणे, परवाना, PUC प्रमाणपत्र आणि HSRP प्लेटशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याचा त्यांच्या आरोप करण्यात आला. तसेच बाईक रॅलीमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी तिवारी यांना फटकारले.
'आझादी का अमृत महोत्सव' अभियानांतर्गत खासदारांनी दिल्लीत तिरंगा यात्रा काढली. सांस्कृतिक मंत्रालयाने काढलेल्या या तिरंगा यात्रेत सर्व खासदार बाईकवर तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरलेले दिसले. या यात्रेत भोजपुरी गायक आणि भाजपा खासदार मनोज तिवारीही सहभागी झाले होते. त्यांचे फोटो नंतर त्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दंड ठोठवल्यानंतर, मी दंड भरणार आहे असं मनोज तिवारी यांनी ट्विटरवर सांगितले. त्यांनी ट्विट केले की, आज हेल्मेट न घातल्याबद्दल मनापासून खेद वाटतो. मी दंड भरेन आणि इनव्हॉइस देईन. तुम्हा सर्वांना विनंती आहे की हेल्मेट न घालता दुचाकी चालवू नका.
नक्की काय घडलं?
फोटोंमध्ये मनोज तिवारी हेल्मेटशिवाय दुचाकीवर स्वार होते. त्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. लोक दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारू लागले. त्यानंतरच पोलिसांनी लगेच कारवाई केली आणि त्यांना त्वरीत चलान पाठवले. पोलिसांनी सर्व गोष्टींची माहिती घेतली असता वाहन मालकही तेवढाच दोषी असल्याचे समोर आले. त्यामुळे मनोज तिवारी यांना २१ हजारांचे चलान पाठवण्यात आले.