भाजपला मोठा धक्का! अभिनेत्री गौतमी तदिमल्ला यांचा राजीनामा; पक्षावर केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 06:03 PM2023-10-23T18:03:00+5:302023-10-23T18:04:43+5:30
गौतमी तदिमल्ला यांनी एक निवेदन जारी करून भाजपवर अनेक आरोप केले आहेत.
चित्रपटात अभिनय ते राजकारण असा प्रवास केलेल्या तमिळ अभिनेत्री गौतमी तदिमल्ला यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. गौतमी तदिमल्ला गेल्या २५ वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत होत्या. दरम्यान, गौतमी तदिमल्ला यांनी भाजपवर अनेक गंभीर आरोप केले आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक्स (पूर्वी ट्विटर) सोशल मीडिया साइटवर भाजप सोडल्याची घोषणा केली.
गौतमी तदिमल्ला यांनी एक निवेदन जारी करून भाजपवर अनेक आरोप केले आहेत. ज्या पक्षनेत्याने आपली फसवणूक केली आणि विश्वासघात केला. तो गेल्या ४० दिवसांपासून कायद्याला बगल देऊन फरार आहे, त्याच व्यक्तीला भाजपचे काही ज्येष्ठ लोक पाठीशी घालत आहेत, त्यामुळेच मी आता पक्षापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे गौतमी तदिमल्ला यांनी म्हटले आहे.
"सी. अलगप्पन यांनी माझे पैसे, मालमत्ता आणि कागदपत्रे घेऊन माझी फसवणूक केली, असे असूनही पक्षातील काही लोक माझ्याऐवजी अलगप्पन यांना पाठिंबा देत आहेत आणि मदत करत आहेत", असे गौतमी तदिमल्ला यांनी सांगितले. तसेच, गौतमी तदिमल्ला यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि तामिळनाडू युनिटचे प्रमुख के. अण्णामलाईसह अनेकांना टॅग केले आहे.
यासोबतच, "२०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी मला राजापलयम मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी देण्यात आली होती. तेव्हा मला आशा होती की पक्ष तिकीट देईल. तळागाळात पक्ष मजबूत करण्यासाठी मी स्वत:ला झोकून दिले, मात्र शेवटच्या क्षणी तसे झाले नाही. २४ वर्षे पक्षाची सेवा करूनही पक्षाने साथ दिली नाही", गौतमी तदिमल्ला यांनी सांगितले.
पोलिसांत तक्रार दाखल
याप्रकरणी गौतमी तदिमल्ला यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, अलगप्पन यांच्यावर अजूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. आता फक्त मुख्यमंत्री आणि न्यायव्यवस्थेकडूनच मला आशा आहे, असे गौतमी तदिमल्ला यांनी सांगितले. दरम्यान, गौतमी तदिमल्ला या साऊथ सुपरस्टार कमल हासन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नी आहेत.