मनी लाँड्रिंग: अभिनेत्री लीना पॉलचा सहभाग; ईडीचा दावा, कोठडीत २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:58 AM2021-10-18T05:58:54+5:302021-10-18T06:00:56+5:30
२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळा करण्यात सुकेश चंद्रशेखर याच्याइतकाच त्याची पत्नी व अभिनेत्री लीना मरिया पॉल हिचाही सक्रिय सहभाग होता, असा ईडीचा दावा आहे.
नवी दिल्ली : २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग घोटाळा करण्यात सुकेश चंद्रशेखर याच्याइतकाच त्याची पत्नी व अभिनेत्री लीना मरिया पॉल हिचाही सक्रिय सहभाग होता, असा ईडीचा दावा आहे. लीना हिच्या कोठडीत न्यायालयाने २३ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.
लाँड्रिंग प्रकरण घोटाळा करण्यात सुकेश चंद्रशेखरसोबत लीनाचाही सहभाग आहे. तिने दिलेल्या सूचनांप्रमाणेच पैशांचे व्यवहार करण्यात आले. त्या व्यवहारांची चौकशी अद्याप पूर्ण व्हायची आहे. लीनाला दिलेल्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळाली नसती तर ही चौकशी अपूर्ण राहिली असती.
फोर्टिस हेल्थ केअरचे प्रवर्तक शिविंदर मोहन सिंग यांची पत्नी अदिती सिंग यांना सुकेश चंद्रशेखर व लीना मरिया पॉल यांनी २०० कोटी रुपयांना फसविले आहे. शिविंदर मोहन सिंग यांना जामीन मिळवून देतो, असे सांगत सुकेश चंद्रशेखर याने अदिती सिंग यांची आर्थिक फसवणूक केली. शिविंदर मोहन सिंग यांना २०१९ साली रेलिगेअर फिनव्हेस्टमध्ये झालेला आर्थिक घोटाळा व मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. लीना मरिया पॉल हिने याआधी मद्रास कॅॅफेसारख्या काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. लीनाच्या नेल आर्टिस्ट्री या कंपनीने चेन्नईमध्ये ४.७९ कोटी, कोचीमध्ये १.२१ कोटीचा व्यवसाय केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. मात्र, हा मनी लाँड्रिंगमधील पैसा आहे, असा ईडीचा दावा आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी लीनाच्या मोबाईलमधील सर्व माहिती ईडीने मिळविली आहे. (वृत्तसंस्था)
२०० कोटीच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात माझी फसवणूक झाली आहे. मी या गुन्ह्यात गुंतलेली नाही, असे बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने सांगितले. तिने एका निवेदनात म्हटले आहे की, मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या निमित्ताने अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे मी हे स्पष्टीकरण दिले आहे.
या प्रकरणाची मला जी माहिती आहे, ती एक साक्षीदार म्हणून मी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. नोरा फतेहीने काही दिवसांपूर्वी ईडीच्या दिल्ली कार्यालयात उपस्थित राहून मनी लाँड्रिंग प्रकरणाविषयी तिच्याकडील माहिती दिली होती. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला उद्या, सोमवारी ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.