गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी आखला होता प्रकाश राज यांना संपवण्याचा कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 17:46 IST2018-06-27T17:43:55+5:302018-06-27T17:46:43+5:30
लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली होती

गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी आखला होता प्रकाश राज यांना संपवण्याचा कट
बंगळुरु : अभिनेते प्रकाश राज हे पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या निशाणाऱ्यावर होते, अशी माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी प्रकाश राज यांच्या हत्येची संपूर्ण योजना आखली होती, अशी धक्कादायक माहितीदेखील तपासातून समोर आली आहे. गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सध्या कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून सुरू आहे.
हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित परशुराम वाघमारेनं गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली दिली आहे. याशिवाय या प्रकरणात आणखी काहींना अटक करण्यात आली आहे. कर्नाटक पोलिसांच्या एसआयटीकडून सध्या परशुराम आणि त्याच्या इतर साथीदारांची चौकशी सुरू आहे. लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी अभिनेते प्रकाश राज यांच्या हत्येचा कट आखल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीतून मिळाली आहे. लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी कडव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी संघटनांवर जोरदार टीका केली होती. याच टीकेमुळे प्रकाश राज यांना संपवण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश राज मँगलोरमधील एका खासगी कार्यक्रमात सहभागी होणार होते. याच कार्यक्रमादरम्यान त्यांची हत्या करण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र या माहितीला एसआयटीनं दुजोरा दिलेला नाही. गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींकडून एक वही जप्त करण्यात आली आहे. या वहीत 11 जणांची नावं आहेत. या 11 जणांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश गृह मंत्रालयानं दिले आहेत.