Coronavirus: "मला चांगले उपचार मिळाले असते तर..."; फेसबुकवर अखेरची पोस्ट लिहून अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:23 PM2021-05-09T15:23:03+5:302021-05-09T15:25:14+5:30
उत्तराखंडमध्ये राहणारे राहुल वोहरा यांनी थिअटरनंतर डिजिटल प्लॅटफोर्मकडे मोर्चा वळवला होता. ते अनेक वेबसिरीजमध्ये दिसतात
अभिनेता आणि थिअटर आर्टिस्ट राहुल वोहरा(Rahul Vohra) यांचे रविवारी कोरोनामुळे(Coronavirus) निधन झालं आहे. दिग्दर्शक आणि थिअटर गुरू अरविंद गौंड यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट टाकून या बातमीला दुजोरा दिला आहे. राहुल वोहरा मागील काही दिवसांपासून कोरोना आजाराशी झुंजत होते. इतकचं नाही तर वारंवार ते फेसबुकवरून मदतीचा याचनाही करत होते. शनिवारी राहुल वोहरा यांनी शेवटची फेसबुक पोस्ट लिहिली त्यात चांगल्या उपचारासाठी त्यांनी मदतीची विनवणी केली होती.
उत्तराखंडमध्ये राहणारे राहुल वोहरा यांनी थिअटरनंतर डिजिटल प्लॅटफोर्मकडे मोर्चा वळवला होता. ते अनेक वेबसिरीजमध्ये दिसतात. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. राहुल वोहरा यांनी शेवटच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय की, मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. तुमचा राहुल वोहरा. त्यापुढे म्हटलंय की, लवकरच जन्म घेईन आणि चांगले काम करेन आता हिंमत हरलो आहे असं राहुल वोहरा यांनी अखेरच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे.
राहुल वोहराच्या निधनानंतर फेसबुकवर अरविंद गौड यांनी लिहिलं आहे की, राहुल वोहरा निघून गेले. एक चांगला अभिनेता आता राहिला नाही. कालच राहुलने सांगितले होते. मला चांगले उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. शनिवारी रात्रीच राहुल वोहराला राजीव गांधी हॉस्पिटलमधून द्वारका येथील आयुष्मान इथे उपचारासाठी पाठवलं होतं. राहुल तुला आम्ही वाचवू शकलो नाही, आम्ही तुझे गुन्हेगार आहोत असं ते म्हणाले आहेत.
राहुल वोहराने त्याच्या अनेक पोस्टमध्ये उपचारासाठी मदत मागितली होती. एका पोस्टमध्ये त्याने लिहिलं होतं की, मी कोविड पॉझिटिव्ह आहे. सध्या माझ्यावर उपचार सुरू आहेत. गेल्या ४ दिवसापासून माझ्या तब्येतीत कोणतीच सुधारणा होत नाही. असं कोणतं हॉस्पिटल आहे का? जिथं मला ऑक्सिजन बेड मिळेल कारण इथं माझी ऑक्सिजन पातळी सातत्याने खालावत आहे आणि मला कोणी पाहणारं नाही. मी खूप मजबुरीने ही पोस्ट लिहित आहे कारण घरातील आता सांभाळू शकत नाहीत.