अभिनेता संचारी 'विजय' यांचे निधन, कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 03:51 PM2021-06-14T15:51:10+5:302021-06-14T15:52:06+5:30
विजय यांचे भाऊ सिद्धेश यांनी सांगितले की, विजय यांचा मेंदू काम करत नव्हता. त्यामुळे, आम्ही त्यांचे शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारी विजय हे स्वत: समाजाभिमूक होते, सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे.
बंगळुरू - कन्नड चित्रपटातील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध अभिनेते संचारी विजय यांची मृत्यूशी झूंज अपयशी ठरली आहे. दोन दिवसांपूर्वी शनिवारी रात्री बंगळुरूजवळ विजय यांच्या गाडीला अपघात झाला होता, आज त्यांचे निधन झाले. अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांचे ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर, विजय यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे पार्थीव शरीर दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
विजय यांचे भाऊ सिद्धेश यांनी सांगितले की, विजय यांचा मेंदू काम करत नव्हता. त्यामुळे, आम्ही त्यांचे शरीर देहदान करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारी विजय हे स्वत: समाजाभिमूक होते, सामाजिक कार्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असायचे, त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले. विजय यांच्या गाडीला शनिवारी रात्री 11.45 वाजता अपघात झाला. ते बाईकवर पाठीमागे बसले होते, पण पावसामुळे रस्ता ओला असल्याने त्यांची बाईक घसरली. त्यामध्ये, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर, त्यांची ब्रेन सर्जरीही करण्यात आली. पण, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, सन 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नानू अवनाल्ला अवालू' चित्रपटातील भूमिकेनंतर संचारी विजय प्रसिद्धीच्या झोतात आले. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. लॉकडाऊन काळात विजय यांनी कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरविण्यासाठीही मदत केली होती. त्यामुळेच, सोशल मीडितूनही त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत असून चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.