सोनू सूद आता मतदानाबद्दल जनजागृती करणार; पंजाबसाठी 'आयकॉन' म्हणून निवड
By कुणाल गवाणकर | Published: November 16, 2020 11:08 PM2020-11-16T23:08:38+5:302020-11-16T23:11:49+5:30
पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेला प्रस्ताव निवडणूक आयोगाकडून मंजूर
चंदिगढ: सामाजिक कार्यामुळे सातत्यानं चर्चेत असलेल्या अभिनेता सोनू सूदचीभारतीय निवडणूक आयोगानं पंजाबचा स्टेट आयकॉन म्हणून निवड केली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. करुणा राजू यांनी याबद्दलची माहिती दिली. पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सूद यांचं नाव सुचवण्यात आलं होतं. त्या प्रस्तावाला निवडणूक आयोगानं मंजुरी दिली आहे.
जनतेमध्ये मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करण्याचं काम सोनू सूद पंजाबमधील निवडणूक कार्यालयाच्या मदतीनं करेल. सोनू सूद गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गरजवंतांना मदत करत आहे. त्याच्या याच कार्याचा विचार करून स्टेट आयकॉन म्हणून त्याची निवड करण्यात आली. सोनू पंजाबच्या मोगा जिल्ह्याचा मूळ रहिवाशी आहे. त्यानं आतापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि पंजाबी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Actor Sonu Sood (in file pic) appointed as the state icon of Punjab by Election Commission. pic.twitter.com/ZoomBzvkDP
— ANI (@ANI) November 16, 2020
कोरोना काळात सोनू सूद देशाच्या विविध भागांमध्ये अडकून पडलेल्या प्रवासी मजुरांना मोलाची मदत केली. शेकडो मजुरांना त्यांच्या घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था सोनूनं स्वखर्चानं केली. त्यामुळे समाजाच्या सर्वच स्तरातून त्याचं कौतुक झालं. आताच्या घडीलाही सोनू अनेक गरजूंना मदतीचा हात देतो. कोरोना संकट काळात शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागत आहे. त्यासाठी सोनूनं काही दिवसांपूर्वीच अनेक विद्यार्थ्यांना स्मार्टफोन उपलब्ध करून दिले.