दिलदार सुपरहिरो! ऑनलाईन शिक्षणासाठी सोनू सूदचा पुढाकार, गावात बसवला थेट मोबाईल टॉवर
By सायली शिर्के | Published: October 4, 2020 03:15 PM2020-10-04T15:15:04+5:302020-10-04T15:35:24+5:30
Sonu Sood : सोनू सूदने आता विद्यार्थ्यांची नेटवर्कची अडचण दूर केली आहे. गावामध्ये थेट मोबाईलचा टॉवरच उभारला आहे.
नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. अभिनेता सोनू सूदने कोरोनाच्या या लढ्यात हजारो लोकांना मदतीचा हात दिला. गेल्या काही महिन्यांपासून अनेक प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी सोनू विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला असून ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.
लॉकडाऊनच्या काळात सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण घेतान स्मार्टफोन नसणं, नेटवर्क नसणं अशा अनेक अडचणींचा सामना हा विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. मात्र सोनू सूदने आता विद्यार्थ्यांची नेटवर्कची अडचण दूर केली आहे. गावामध्ये थेट मोबाईलचा टॉवरच उभारला आहे. पंचकुलापासून जवळपास 15 किलोमीटर असलेल्या दापना गावातील विद्यार्थ्यांना खराब नेटवर्कमुळे अभ्यास करताना काही समस्यांचा सामना करावा लागत होता.
मोबाईल टॉवर नसल्याने मुलं झाडावर चढून करत होती अभ्यास
गावामध्ये एकही मोबाईल टॉवर नसल्याने मुलं झाडावर चढून अभ्यास करत होती. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करताना येणारी नेटवर्कची अडचण सोनू सूदने मोबाईलचा टॉवर बसवून दूर केली आहे. काही दिवसांपूर्वी सोनूने सोशल मीडियावर झाडावर चढून अभ्यास करणाऱ्या मुलांचे व्हायरल झालेले काही फोटो पाहिले होते. त्यानंतर हे फोटो नेमके कोणत्या ठिकाणचे आहेत याची माहिती करून घेतली आणि मुलांची अडचण दूर करण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांची अडचण दूर झाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण
सोनू सूदने आपल्या एका मित्राच्या मदतीने गावात मोबाईल टॉवरच उभारला आहे. मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थ्यांची अडचण दूर झाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण असून सोनूचं भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर या दिलदार सुपरहिरोचं भरभरून कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी सोनू सूदच्या एका चाहत्याने चक्क सिम कार्डवर त्याचं चित्र काढलं होतं. ट्विटरवर एका युजरने याबाबत एक ट्विट केलं आहे. सिम कार्डवर सोनू सूदचा फोटो दिसत आहे. "सोनू सर, मी तुमचा फोटो सिम कार्डवर पेंट केला आहे. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही खूप ग्रेट काम करत आहात" असं देखील युजरने ट्विटमध्ये म्हटलं. सिम कार्डवरील सोनू सूदचा हा फोटो जोरदार व्हायरल झाला होता.
सिम कार्डवर सोनू सूदचं चित्र, अभिनेत्याने दिली भन्नाट रिअॅक्शन
अभिनेता सोनू सूदने हा फोटो आणि ट्विट पाहिलं असून त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिली होती. 10 G नेटवर्क असं म्हटलं. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने देखील ट्विट केलं होतं. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या एका महिला इंजिनिअरला सोनूने नोकरीची संधी दिली. कोरोनामुळे या महिलेला आपली नोकरी गमवावी लागली. परिस्थिती बिकट असल्याने तिने हैदराबादमध्ये भाजी विकायला सुरुवात केली. शारदा असं या 28 वर्षीय महिलेचं नाव असून सोनू सूदने तिला नोकरीची ऑफर दिली. याआधीही सोनू सूद कित्येक गरजूंना सर्वोतोपरी मदत केली आहे. त्याचे हे कौतुकास्पद काम सातत्याने सुरू आहे. कोरोनाच्या संकटात तो लोकांसाठी देवदूत ठरला आहे.