अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 11:26 AM2022-05-28T11:26:01+5:302022-05-28T11:26:35+5:30

सुरक्षा दलांकडून काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

Actress Amarin's killers killed, 4 terrorists killed | अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

अभिनेत्री आमरीनच्या मारेकऱ्यांना कंठस्नान, 4 दहशतवाद्यांचा खात्मा

Next

सुरेश डुग्गर
लाेकमत न्यूज नेटवर्क
जम्मू : काश्मीरमधील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आमरीन भट्ट यांची दाेन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली हाेती. त्यांच्या मारेकऱ्यांना ४८ तासांमध्ये सुरक्षादलांनी यमसदनी धाडले आहे. सुरक्षादलांनी मुश्ताक भट्ट आणि फरहान हबीब अशी ठार मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. लष्कर-ए-ताेयबाचा कमांडर लतीफ याच्या इशाऱ्यावरून आमरीन यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 

गेल्या २४ तासांमध्ये सुरक्षादलांनी वेगवेगळ्या चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. चाैघेही ‘लष्कर’चे सदस्य हाेते. काश्मीरचे पाेलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी यासंदर्भात सांगितले, की बडगाममधील चाडुरा भागात मुश्ताक आणि फरहान हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली हाेती. त्यांना आत्मसमर्पणाची पूर्ण संधी देण्यात आली हाेती. दोघांनी आमरीन यांच्यावर त्यांच्या घरासमोरच गोळीबार केला होता. तर, साैरा भागातही चकमकीत आणखी दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. 

गेल्या पाच महिन्यांत १५ जवान शहीद
गेल्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत १५ नागरिकांचा मृत्यू झाला, तर सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकींमध्ये १५ जवान शहीद झाले आहेत. येत्या ३० जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. काश्मिरी पंडित राहुल भट्ट, अभिनेत्री अमरीन भट्ट यांच्या हत्येमुळे हे स्पष्ट झाले की, दहशतवादी काश्मिरी पंडित व नामवंत लोकांना लक्ष्य करत आहेत.

यंदाच्या वर्षी ८८ दहशतवाद्यांचा खात्मा
काश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी सुरक्षा जवानांनी ८८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये ३० विदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी रद्द केले. तेव्हापासून आजवर ५५० दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांनी कंठस्नान घातले आहे. या व्यापक कारवाईमुळे दहशतवाद्यांनी आपल्या व्यूहनीतीत बदल केला. घातपाती कारवाया घडविण्यासाठी ते काश्मीरमधील स्थानिक युवकांचा वापर अधिक प्रमाणात करू लागले.

तीन दिवसांत दहा दहशतवादी ठार
दाेघांनी नुकताच ‘लष्कर’मध्ये प्रवेश केला हाेता. त्यांच्याकडून एके-५६ रायफल, चार मॅगझीन आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये दहा दहशतवाद्यांना ठार मारले आहे.

Web Title: Actress Amarin's killers killed, 4 terrorists killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.