वर्षात ३० वेळा दुबई ट्रिप, पण एक चूक केली अन् अडकली; रान्या रावला अशी झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:19 IST2025-03-06T11:12:54+5:302025-03-06T11:19:16+5:30

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Actress Ranya Rao gets caught in gold smuggling case after going to Dubai 4 times in the same outfit | वर्षात ३० वेळा दुबई ट्रिप, पण एक चूक केली अन् अडकली; रान्या रावला अशी झाली अटक

वर्षात ३० वेळा दुबई ट्रिप, पण एक चूक केली अन् अडकली; रान्या रावला अशी झाली अटक

Ranya Rao Gold Smuggling Case: कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर  साडे चौदा किलो सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे.  जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल १२.५६ कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणात रान्याच्या घरावरही धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर आता या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. रान्या रावने गेल्या वर्षभरात ३० वेळा सौदी जाऊन सोन्याची तस्करी केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र यावेळी एका चुकीमुळे रान्या राव महसूल गुप्तचर संचालनालयाच्या तावडीत सापडली.

३२ वर्षीय कन्नड अभिनेत्री आणि मॉडेल रन्या राव हिला सोन्याची तस्करी करताना बंगळुरुत अटक करण्यात आली. रान्याला बंगळुरुच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने अटक केली. तपासादम्यान, रान्याच्या जॅकेटमध्ये लपवलेले १४.२ किलो सोने सापडले. त्यानंतर अटक करुन रान्याला पुढील चौकशीसाठी नागावरा येथील डीआरआय कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर रान्या रावला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तपासादरम्यान, गेल्या वर्षभरात रान्याने ३० वेळा दुबईला प्रवास केल्याचे म्हटलं जात आहे. प्रत्येकवेळी दुबईला गेल्यानंतर रान्याने काही किलो सोने लपवून आणले होते. प्रत्येक किलोसाठी तिला १ लाख मिळायचे अशी माहिती समोर आली आहे. प्रत्येक ट्रिपमधून रान्या १२ ते १३ लाख रुपये कमावयची. सोन्याच्या तस्करीसाठी ती जॅकेट आणि कमरेचा पट्टा वापरायची. प्रत्येक प्रवासादरम्यान तिने तेच जॅकेट आणि पट्टा वापरला होता. कोणताही व्यवसाय नसताना रान्या १५ दिवसांत चारवेळा दुबईला गेली होती.

रान्या रावने तिच्या मागील चार दुबई ट्रिपमध्ये सारखेच कपडे घातले होते ज्यांनी तस्करीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. रान्याने आणलेलं सोने एका खास डिझाइन केलेल्या पट्ट्यात लपवले होते, ज्यामुळे नीट तपासणीशिवाय ते शोधणे कठीण होते. चारही वेळा दुबईहून परतल्यानंतर प्रत्येक वेळी तिला विशेष मदत पुरवण्यात आली होती. बंगळुरू विमानतळावर तैनात कॉन्स्टेबल बसवराजने तिला मदत करत  सरकारी वाहनाने विमानतळाबाहेर नेले होते. यामुळे तिची नियमित सुरक्षा तपासणी होत नव्हती. रान्याच्या वारंवार दुबई दौऱ्यावरुन डीआरआयच्या अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी पुढील कारवाई केली.

दरम्यान, सोमवारी जेव्हा रान्या दुबईवरुन परतली तेव्हाही बसवराजने तिला बाहेर जाण्यासाठी मदत केली होती. मात्र विमानतळाच्या बाहेर पडण्याआधीच डीआरआयच्या अधिकाऱ्यांना तिला ताब्यात घेतलं आणि तिची तपासणी केली. तपासणीदरम्यान, तिच्या खास बेल्टमध्ये १४ किलो आढळून आलं.
 

Web Title: Actress Ranya Rao gets caught in gold smuggling case after going to Dubai 4 times in the same outfit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.