मिठाईच्या डब्यातून IAS अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न, अदानी ग्रुपच्या कर्मचाऱ्याला ओडिशात अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 04:28 PM2024-09-12T16:28:34+5:302024-09-12T16:29:45+5:30
ओडिशात अदानी समुहाच्या एका अधिकाऱ्याला लाच देण्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या अधिकाऱ्याने आणलेल्या मिठाईच्या डब्यात पैशाची रोकड सापडली आहे.
ओडिशामध्ये अदानी समुहाच्या एका अधिकाऱ्याला पोलिसांनी लाच देण्याच्या आरोपाखाली अटक केली. अदानी समुहातील अंबुजा सिमेंट या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी एका आयएएस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. बुधवारी एक व्यक्ती बारगडचे जिल्हाधिकारी आदित्य गोयल यांच्या कार्यालयात पोहोचला. यावेळी त्यांनी आयएएस अधिकाऱ्याला फुलांचा गुच्छ आणि मिठाईचा बॉक्स दिला, यावेळी आयएएस अधिकाऱ्यांना त्या बॉक्सबाबत संशय आला, यामुळे त्यांनी लगेच तो बॉक्स तपासण्याची सूचना दिली. यावेळी त्यात पैसे दिसले.
मिळालेल्या माहितीनुसार, पॅकेटबाबत शंका आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या शिपायाला पॅकेट उघडण्याची सूचना केली. पाकिटात ५०० रुपयांच्या नोटांचे चार बंडल आढळून आले. यानंतर त्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून दक्षता अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली.
Video - पावसाचा प्रकोप! मध्य प्रदेशमध्ये ४०० वर्षे जुनी भिंत कोसळली, ७ जणांचा मृत्यू, २ जण जखमी
यानंतर दक्षता पथक तेथे पोहोचले आणि त्यांनी २ लाख रुपयांची रोकड असलेले एक पॅकेट जप्त केले. रामभव गट्टू, मुख्य बांधकाम अधिकारी, अंबुजा सिमेंट, छत्तीसगड असे त्या व्यक्तीचे नाव आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
त्या कर्मचाऱ्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सुधारणा कायदा, २०१८ च्या कलम ८/९/१० अन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात येत आहे. २०२२ मध्ये अदानी ग्रुपने होल्सीम ग्रुपकडून अंबुजा सिमेंटचे अधिग्रहण केले होते.