मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प मिळाला अदाणीला; १४३ एकरवरील योजना, ३६ हजार कोटींची बोली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 11:25 IST2025-03-12T11:25:20+5:302025-03-12T11:25:20+5:30
नवी दिल्ली : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ गोरेगाव (पश्चिम) मधील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प अदाणी समूहास मिळाला आहे. १४३ एकरवर ...

मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प मिळाला अदाणीला; १४३ एकरवरील योजना, ३६ हजार कोटींची बोली
नवी दिल्ली : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ गोरेगाव (पश्चिम) मधील मोतीलालनगर पुनर्विकास प्रकल्प अदाणी समूहास मिळाला आहे. १४३ एकरवर पसरलेल्या या प्रकल्पासाठी अदाणी समूहाने सर्वाधिक ३६ हजार कोटी रुपयांची बोली लावली आहे.
मोतीलाल नगर-१, २ आणि ३ हा मुंबईतील सर्वात मोठ्या निवासी पुनर्विकास प्रकल्पांपैकी एक आहे. या प्रकल्पासाठी अदाणी प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने (एपीपीएल) सर्वात मोठी बोली लावली आहे. प्रतिस्पर्धी कंपनी एल अँड टीच्या तुलनेत अधिक निर्मित क्षेत्राची पेशकशही एपीपीएलने केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
अत्याधुनिक सदनिका उभारणार
याप्रकरणी अदाणी समूहाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासाचे काम अदाणी समूहास यापूर्वी मिळाले आहे. धारावी पुनर्विकास योजना प्रा. लि. मध्ये अदाणी समूहाची ८० टक्के हिस्सेदारी असून, उरलेली हिस्सेदारी राज्य सरकारची आहे.
एखाद्या 'बांधकाम व विकास संस्थे'च्या (सी अँड डीए) मार्फत मोतीलालनगरचा पुनर्विकास करण्याची परवानगी म्हाडास मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सप्ताहात दिली होती. या योजनेवर म्हाडाचे नियंत्रण असेल, मात्र काम 'सी अँड डीए'मार्फत होईल. त्यानुसार हे काम अदाणी समूहास देण्यात आले. मोतीलालनगरात आधुनिक सदनिका उभारल्या जातील.
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ७ वर्षांचा अवधी निश्चित करण्यात आला आहे. निविदांच्या अटीनुसार 'सी अँड डीए'ला पुनर्विकासासाठी ३.८३ लाख चौरस मीटर निवासी क्षेत्र सोपविण्याची तरतूद आहे. तथापि, अदाणी समूहाने म्हाडास ३.९७ लाख चौरस मीटर क्षेत्र सोपविण्यास सहमती देऊन बोली जिंकली आहे.