देशातील पाच विमानतळांचे संचालन करण्याचे काम आता अदानी समूहाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 06:38 AM2019-02-26T06:38:14+5:302019-02-26T06:38:18+5:30
अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू, जयपूरचा समावेश
नवी दिल्ली : केंद्र सरकारने सहा विमानतळांच्या खासगीकरणासाठी जी निविदा प्रक्रिया राबविली त्यातील पाच विमानतळांच्या संचालनाची बोली अदानी समूहाने जिंकली आहे. त्यामुळे या पाच विमानतळांच्या संचालनाची जबाबदारी आता अदानी समूहाकडे येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ही विमानतळे खासगी कंपनीकडे दिल्याने तिथे जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळू शकतील.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, लखनौ, मंगळुरू आणि जयपूर विमानतळांसाठी अदानी यांनी सर्वाधिक मोठी बोली लावली होती. याशिवाय आसाममधील गुवाहाटी विमानतळासाठी गुरुवारी बोली लावण्यात येणार आहे. मासिक प्रति प्रवासी शुल्क या आधारावर विमानतळ प्राधिकरणाने ही निवड केली आहे.
प्राधिकरणाºया अधिकाऱ्यांनी सांगितले की, अदानी समूहाने लावलेली बोली ही अन्य स्पर्धकांच्या तुलनेत मोठी होती. ही पाच विमानतळे औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाकडे सोपविण्यात येणार आहेत. सहा विमानतळांसाठी १० कंपन्यांकडून ३२ तांत्रिक निविदा आमच्याकडे आल्या होत्या. ही सहा विमानतळे सध्या विमानतळ प्राधिकरणाच्या व्यवस्थापनाकडे आहेत.
जागतिक दर्जाच्या सुविधा देणार
सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सहा विमानतळांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारीसाठी (पीपीपी) एका प्रस्तावाला मंजुरी दिली होती. अहमदाबाद आणि जयपूर विमानतळासाठी सात निविदा विमानतळ प्राधिकरणाकडे आल्या होत्या. लखनौ आणि गुवाहाटीसाठी सहा निविदा, तर मंगळुरू आणि तिरुवनंतपूरमसाठी तीन निविदा प्राप्त झाल्या होत्या. जागतिक स्तराच्या पायाभूत सुविधा पुरविणे हा यामागचा हेतू आहे.