जीत अदानींची 'मंगल सेवा', दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी खर्च करण्याचा संकल्प; गौतम अदानी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 09:32 IST2025-02-06T09:31:37+5:302025-02-06T09:32:46+5:30
अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे.

जीत अदानींची 'मंगल सेवा', दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी खर्च करण्याचा संकल्प; गौतम अदानी म्हणाले...
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरु आहे. या महाकुंभ मेळ्याच्या संपूर्ण काळामध्ये अदाणी ग्रुपकडून (Adani Group) महाप्रसाद सेवा दिली जात आहे. या सेवेसोबतच आता अदानी ग्रुपने आणखी एक चांगला निर्णय घेतला आहे. अदानी ग्रुपने दिव्यांग मुलींच्या लग्नासाठी खर्च करण्याचा संकल्प केला आहे. अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे.
गौतम अदानी यांचा मुलगा जीत आणि सून दिवा एका पवित्र संकल्पाने आपले वैवाहिक जीवन सुरू करणार आहेत. जीत आणि दिवा यांनी 'मंगल सेवा' करण्याचा संकल्प केला असून त्यानुसार दरवर्षी ५०० दिव्यांग मुलींच्या लग्नात प्रत्येक मुलीला १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
गौतम अदानी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, "माझा मुलगा जीत आणि सून दिवा एका पवित्र संकल्पाने त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जीत आणि दिवा यांनी दरवर्षी ५०० दिव्यांग बहिणींच्या लग्नात प्रत्येक बहिणीला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊन 'मंगल सेवा' करण्याचा संकल्प केला आहे."
याचबरोबर, "एक वडील म्हणून, ही 'मंगल सेवा' माझ्यासाठी खूप समाधानाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, या पवित्र प्रयत्नातून अनेक दिव्यांग मुली आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन आनंद, शांती आणि सन्मानाने पुढे जाईल. माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे की, जीत आणि दिवा यांना सेवेच्या या मार्गावर पुढे जाण्यासाठी आशीर्वाद आणि शक्ती द्यावी", असे गौतम अदानी यांनी एक्सवरील पोस्टद्वारे म्हटले आहे.
यह अत्यंत हर्ष का विषय है कि मेरा बेटा जीत और बहू दिवा अपने वैवाहिक जीवन की शुरुआत एक पुण्य संकल्प से कर रहे हैं।
— Gautam Adani (@gautam_adani) February 5, 2025
जीत और दिवा ने प्रति वर्ष 500 दिव्यांग बहनों के विवाह में प्रत्येक बहन के लिए 10 लाख का आर्थिक सहयोग कर ‘मंगल सेवा’ का संकल्प लिया है।
एक पिता के रूप में यह ‘मंगल… pic.twitter.com/tKuW2zPCUE
जीत आणि दिवा यांचे उद्या लग्न
गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी आणि दिवा जैमिन शाह यांचे लग्न शुक्रवार, ७ फेब्रुवारी रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे होणार आहे. दरम्यान, जीत यांच्या लग्नाबद्दल गौतम अदानी म्हणाले होते की, त्यांचे लग्न खूप साधे आणि पूर्णपणे पारंपारिक असेल. जीत आणि दिवा यांचा साखरपुडा मार्च २०२३ मध्ये झाला होता. दिवा या देशातील प्रसिद्ध हिरे व्यापारी जैमिन शाह यांच्या कन्या आहेत. जैमिन शाह यांची कंपनी मुंबई आणि सुरतमध्ये व्यवसाय करते. तसेच, जीत अदानी हे सध्या अदानी ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये आपली भूमिका बजावत आहेत.