Adani: शेअर पडले, अर्धी संपत्ती बुडाली, तरीही अदानींच्या चेहऱ्यावर हसू? नेमकं प्रकरण काय, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 10:54 AM2023-02-17T10:54:10+5:302023-02-17T10:54:59+5:30
Adani: एकीकडे प्रचंड नुकसान होत असतानाही अदानी समूह ऑल इज वेल असल्याचे सांगत आहे, त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी उद्योग समुहातील कंपन्यांबाबत प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनंतर या समुहामध्ये खळबळ उडाली होती. तसेच अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याने अदानी समुहातील कंपन्यांच्या शेअरमध्ये प्रचंड घसरण होत आहेत. त्यामुळे अदानींची संपत्ती निम्म्याने घटली आहे. मात्र एकीकडे प्रचंड नुकसान होत असतानाही अदानी समूह ऑल इज वेल असल्याचे सांगत आहे, त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे.
चहुबाजूंनी गौतम अदानींच्या कर्जाबाबत चर्चा होत आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये क्रेडिटसाइट्सनेही अदानी समुहाच्या कर्जाबाबत चिंता व्यक्त केली होती. ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रीनचा कर्ज इक्विटी रेश्यो सर्वात खराब असल्याचे सांगण्यात आले. मात्र खरोखरच अदानी समुहासाठी कर्ज हा चिंतेचा विषय आहे का याचाही विचार करावा लागेल. कारण ज्या कर्जाच्या मुद्द्यावरून वाद होत आहे, त्याबाबत अदानी समूह निश्चिंत आहे. तसेच आपल्याकडे पुरेसा निधी असल्याचे सांगत आहे. अदानी समुहाच्या डोक्यावर जेवढं कर्ज आहे. त्यापेक्षा दुप्पट त्यांची वैयक्तिक नेटवर्थ आहे. जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्गचा अहवाल येण्यापूर्वी ती ५ पट अधिक होती. मात्र शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे तिच्यात मोठी घट झाली आहे. मार्च २०२२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार अदानी समुहाच्या डोक्यावर सुमारे २ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र अदानींच्या नेटवर्थसमोर हे कर्ज फार कमी आहे. फोर्ब्स बिलेनियर लिस्टमधील माहितीनुसार त्यांची खासगी संपत्ती ही ४.४६ लाख कोटी रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच आणीबाणीच्या प्रसंगी ते आपली अर्धी संपत्ती देऊन कर्जफेड करू शकतात.
अदानी समुहाच्या डोक्यावरील दोन लाख कोटी रुपयांचं कर्ज हे जेवढं मोठं वाटतं तेवढं प्रत्यक्षात ते मोठं नाही आहे. अदानी समुहाकडील कंपन्यांचं मार्केट कॅप आणि त्यांचं उत्पन्न पाहता या कंपनीसाठी कर्जाचा बोजा मोठा नाही आहे. अदानींच्या बॅलन्स शिटमध्ये ०.२७ लाख कोटी कॅश आहे. ही रक्कम एकूण कर्जाच्या १.३० लाख कोटींच्या आसपास आहे.
अदानींकडे एकूण किती संपत्ती आहे याची माहितीही वैशिष्यपूर्ण आहे. शेअर बाजारामधील चढ उतारांमुळे अदानींकडील जंगम संपत्तीमध्ये चढ उतार होत असतात. मात्र त्यांच्याकडे बंदरे, विमानतळ, पेट्रोकेमिकल्स, रियल इस्टेट, सिमेंट, आयात निर्यात, एफएमजीटीसह अनेक मालमत्ता आहेत. अदानी समुहाने कोरोना काळात अनेक कंपन्यांचे अधिग्रहण केले होते. त्यांच्या १० कंपन्या शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत. तसेच गौतम अदानींच्या खासगी संपत्तीचा विचार केल्यास त्यांच्याजवळ ३ महागडी जेट हेलिकॉप्टर्स आणि लक्झरी कारचं कलेक्शन आहे. त्यामध्ये फेरारी, बीएमडब्ल्यू आदी कारचा समावेश आहे. तसेच अदानी समुहाकडे १७ मालवाहू जहाजे आणि १३ बंदरे आहेत.