कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आनंद; म्हणाले, "जी जोखीम पत्करली..."
By जयदीप दाभोळकर | Published: January 3, 2021 01:03 PM2021-01-03T13:03:31+5:302021-01-03T13:06:21+5:30
डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली.
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने दोन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत डीसीजीआयने ही माहिती दिली. डीसीजीआयचे संचालक व्ही.जी. सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली. यानंतर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला.
"नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. लस संकलनासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं पत्करलेल्या सर्व जोखीमांनांतर अखेर यश मिळालं. करोनावर मात करणारी कोविशिल्ड ही पहिली लस असून तिच्या वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असून पुढील आठवड्यापासून ती देण्यास तयार आहे," असं ट्वीट अदर पुनावाला यांनी केलं. या ट्वीटसोबतच अदर पुनावाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, बिल गेट्स, केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, ऑक्सफर्डसह अनेकांचे आभार मानले.
Happy new year, everyone! All the risks @SerumInstIndia took with stockpiling the vaccine, have finally paid off. COVISHIELD, India's first COVID-19 vaccine is approved, safe, effective and ready to roll-out in the coming weeks. pic.twitter.com/TcKh4bZIKK
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 3, 2021
Thank you Hon. Sri @narendramodi Ji, Hon. Sri @drharshvardhan Ji, @MoHFW_INDIA@ICMRDELHI@DBTIndia#DCGI_India@UniofOxford@AstraZeneca@gavi@GaviSeth@gatesfoundation and @BillGates for your support
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 3, 2021
शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या कोरोनावरच्या तज्ज्ञ समितीने मान्यता दिली होती. त्यानंतर आता डीसीजीआयकडून परवानगी मिळाली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयनं म्हटलं आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असं व्ही.जी. सोमाणी म्हणाले.