Padma Awards 2022: वडिलांना पद्म पुरस्कार मिळाल्यावर अदर पूनावालांची भावूक पोस्ट; बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 03:00 PM2022-01-26T15:00:38+5:302022-01-26T15:02:48+5:30
Padma Awards 2022: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली.
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे जग पिसले आहे. यावर एकमेव उपाय असलेल्या कोरोना लसीच्या निर्मितीत अत्यंत मोलाचा वाटा उचललेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) यांना केंद्र सरकाने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. यानंतर सुपुत्र अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी लहानपणीचा एक फोटो शेअर करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सीरम इन्स्टिट्यूटकडून आताच्या घडीला कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती केली जाते. सायरस पूनावाला यांनी पुण्यातील हडपसर परिसरात १९६६ साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. तेव्हापासून ही संस्था देशामधील लसीनिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या संस्थांपैकी एक आहे. वडील सायरस पूनावाला यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अदर पूनावाला यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपल्या बालपणीचा फोटो शेअर करत त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
भारत सरकारचे आभार मानू इच्छितो
या वर्षी पद्म पुरस्कार मिळवणाऱ्या सर्व व्यक्तींचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी भारत सरकारचे आभार मानू इच्छितो. त्यांनी माझे मार्गदर्शक, माझे हिरो, माझे वडील डॉक्टर सायरस पूनावाला यांच्या कामाची दखल घेतली, असे ट्विट अदर पूनावाला यांनी केले आहे. या ट्विटसोबत अदर पूनावाला यांनी आपल्या बालपणीचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये अदर हे अगदीच चिमुकले दिसत आहेत. फोटोमध्ये विलू सायरस पूनावाला यांच्या कुशीत असणारा चिमुकला मुलगा अदर पुनावाला आहेत. अदर यांचे वडील सायरस हे हसत आपल्या मुलाकडे पाहताना या फोटोत दिसत आहे.
दरम्यान, देशाच्या जडणघडणीत अनन्यसाधारण योगदान देणाऱ्या दिग्गजांच्या बरोबर पद्म किताबाचा मानकरी ठरणे हा माझा बहुमान आहे. भारत सरकारला मी मन:पूर्वक धन्यवाद देतो. आरोग्य हा समाजाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. सर्वाना समान आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी प्रतिक्रिया सायरस पूनावाला यांनी दिली.