'आदर्श ग्राम योजनेचा' मोदींच्या हस्ते शुभारंभ, मात्र शिवसेना खासदार अनुपस्थित
By admin | Published: October 11, 2014 12:03 PM2014-10-11T12:03:20+5:302014-10-11T13:21:03+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी 'खासदार आदर्श ग्राम योजने'चा शनिवारी शुभारंभ केला, मात्र शिवसेनेचे खासदार या कार्यक्रमास अनुपस्थित होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ' खासदार आदर्श ग्राम योजने'चा आज (शनिवार) शुभारंभ केला, मात्र या कार्यक्रमास शिवसेनेचा एकही खासदार उपस्थित नव्हता. शिवसेना-भाजपाची गेल्या २५ वर्षांपासून असलेली युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करताना दिसत असून सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसनेचे खासदार आदर्श ग्राम योजनेच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील का याबद्दल उत्सुकता होती, मात्र एकही खासदाराने या कार्यक्रमाला हजेरी लावली नाही.
लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मदिनी राजधानी दिल्लीतील विज्ञान भवन येथे या योजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्गाटन झाले. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी या योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करायचा आहे. ही योजना ३ टप्प्यांत राबवण्यात येईल. अल्प काळातील कामे तीन महिन्यांत पूर्ण करावी लागतील. तर मध्यम मुदत एक वर्ष व दीर्घ मुदत एका वर्षापेक्षा जास्त देण्यात आली आहे. त्या कालावधीत गावांची कामे पूर्ण करावी लागतील. खुद्द पंतप्रधानही त्यांच्या वारणासी मतदारसंघातील ककरिया गाव दत्तक घेऊन विकास करणार आहेत.
गावाचा विकास झाला तरच देशाचा विकास शक्य आहे असे सांगत पंतप्रधानांनी या योजनेची आवश्यकता स्पष्ट केली. मात्र खासदारांना आपले स्वत:चे वा सासुरवाडीचे गाव दत्तक घता येणार नाह, असा टोलाही पंतप्रधानांनी यावेळी लगावला.