मोदींच्या करिष्म्यासोबतच 'या' खास रणनीतीने भाजपाला उत्तर प्रदेशात मिळवून दिले बंपर यश
By बाळकृष्ण परब | Published: May 26, 2019 09:59 AM2019-05-26T09:59:33+5:302019-05-26T10:02:09+5:30
नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला.
- बाळकृष्ण परब
नवी दिल्ली - नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. अगदी 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला. ती रणनीती म्हणजे मिशन 50 टक्के+. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्यासाठी आखलेली खास योजना.
उत्तर प्रदेशात सपा-बसपा महाआघाडी झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या मतांची गोळाबेरीज करून भाजपाच्या पराभवाचे गणित मांडले जात होते. साधारण वर्षभरापूर्वीपासून येत असलेल्या विविध ओपिनियन पोलमधूनही तेच चित्र दिसत होते. त्यामुळे मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांचे व्यापक ऐक्य करून मतांचे गणित साधण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर तोडगा म्हणून आपला मतदार वाढवून 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याची रणनीती आखली गेली.
विशेषत: उत्तर प्रदेशात महाआघाडीच्या मतांच्या गोळाबेरीजेवर मात करण्यासाठी भाजपाने प्रत्येक मतदारसंघात 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याच्या मोहिमेवर काम सुरू केले. त्यासाठी बुथप्रमुख आणि पन्नाप्रमुख अशा अगदी छोट्या पातळीवर नियोजन केले गेले. त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी सुमारे सहा ते सात टक्क्यांनी वाढली. त्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशात भाजपाला 62 जागा जिंकता आल्या. तर महाआघाडीच्या मतांची गोळाबेरीज करून भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांना जबर धक्का बसला. अगदी सपा, बसपा, रालोदसोबत काँग्रेसही आली असती तरी भाजपाला फारसे नुकसान झाले नसते. मतदारसंघनिहाय विचार केल्यास उत्तर प्रदेशातील सुमारे 40 च्या आसपास मतदारसंघात भाजपाला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. तर पाच ते सहा मतदारसंघात भाजपाची मतांची टक्केवारी 49 ते 50 टक्क्यांच्यादरम्यान राहिली.
उत्तर प्रदेशच नाही तर देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपाची मतांची टक्केवारी 50 टक्क्यांहून अधिक राहिली. त्या राज्यांमध्ये गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमध्ये भाजपाने 50 टक्के मतांचा टप्पा ओलांडला. तसेच भाजपाच्या निवडून आलेल्या 303 खासदारांपेकी 170 हून अधिक खासदारांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. भाजपाची ही मतांची वाढती टक्केवारी विरोधी पक्षांसाठी चिंतेची बाब आहे. कारण ही टक्केवारी कायम राखल्यास सर्वपक्षीय ऐक्यानंतरही भाजपाला पराभूत करणे विरोधी पक्षांना कठीण होणार आहे.