चीनच्या सीमेवर तैनात केले अतिरिक्त ५० हजार सैनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:14 AM2021-06-29T11:14:52+5:302021-06-29T11:15:18+5:30
भारताचे एकूण दाेन लाख सैनिक तैनात
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : चीनच्या वाढत्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने प्रथमच अतिशय आक्रमक पावित्रा घेतला आहे. भारताने चीनच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी ५० हजार अतिरिक्त सैनिकांना तैनात केले आहे. त्यामुळे चीनवर नजर ठेवण्यासाठी तब्बल २ लाखांहून अधिक सैन्य सीमेवर तैनात आहे.
चीनच्या सीमेवरील वेगवेगळ्या भागात भारताने लष्कर आणि लढाऊ विमाने तैनात केलेली आहेत. गेल्या वर्षभरात भारताने चीनच्या सीमेवर सैनिकांची संख्या वाढविली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ४० टक्के अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी पाकिस्तानसाेबत असलेला तणाव शांतपणे हताळण्याची भूमिका घेतानाच चीनला प्रत्युत्तर देण्यावर लक्ष्य केंद्रित केले आहे.
आक्रमक प्रत्युत्तर?
आतापर्यंत भारताची भूमिका केवळ चीनच्या हालचाली राेखण्यापुरती मर्यादित हाेती. मात्र, अतिरिक्त सैनिकांच्या तैनातीमुळे भारताने पावित्रा बदलल्याचे दिसत आहे. या चालीमुळे गरज भासल्यास आक्रमक प्रत्युत्तर देता येईल. ‘रक्षणासाठी आक्रमण’ या धाेरणानुसार चीनमधील भूभागही काबीज करण्याचा पर्याय भारतीय लष्करासमाेर राहणार आहे.
काश्मीर, लडाखला बाहेर दाखविणारा नकाशा हटविला
नवी दिल्ली : ट्विटरने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जम्मू- काश्मीर आणि लडाखला त्याने स्वतंत्र देश म्हणून नकाशात दाखवले मात्र, देशातून होत असलेल्या मोठ्या विरोधानंतर ट्वीटरने हा नकाशा हटविला आहे. ट्विटरने भारताचा विपर्यस्त नकाशा दाखवण्याची ही काही पहिली वेळ नाही. मागच्या वर्षी केंद्र सरकारने ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भारताच्या विपर्यस्त नकाशाबद्दल पत्र लिहून तीव्र नापसंती व्यक्त केली होती.