नेहरू-गांधी कुटुंबाच्या नावाला असामान्य महत्त्व, अधीर रंजन चौधरी यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 05:40 AM2019-08-18T05:40:58+5:302019-08-18T05:45:01+5:30
राजकारणातही ब्रँड इक्विटी असते. जर आपण सध्या भाजपकडे पाहिले, तर मोदी आणि शहा यांच्याशिवाय पक्ष व्यवस्थित चालू शकतो? काँग्रेस पक्षातही गांधी कुटुंबच आमची ब्रँड इक्विटी आहे. हे एक कठोर वास्तव आहे.
कोलकाता : गांधी-नेहरू कुटुंबाच्या बाहेरील व्यक्तीला पक्षाचे नेतृत्व करणे अवघड होईल, कारण या कुटुंबाची एक ब्रँड इक्विटी (नावाचे महत्त्व, दायित्व) आहे, असे मत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेससारखा मजबूत विचारसरणीचा पक्षच भाजपचा जातीयवादी रथ रोखू शकतो.
चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रादेशिक पक्ष ज्या प्रकारे काम करीत आहेत त्यावरून ते आगामी काळात आपले महत्त्व हरवून बसतील. याचाच अर्थ देश द्विधु्रवी राजकारणाकडे आगेकूच करील. अशी राजकीय परिस्थिती आल्यानंतर आम्ही पुन्हा सत्तेत येऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसचे भविष्य उज्ज्वल आहे. चौधरी म्हणाले की, प्रादेशिक पक्षांमध्ये वैचारिक प्रेरणेचा अभाव आहे. तथापि, काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांना व्यापक समर्थन आहे.
चौधरी म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यास सोनिया गांधी अनिच्छुक होत्या; पण राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्ष संकटात असल्याचे पाहून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची विनंती मान्य केली. ते म्हणाले की, सोनिया गांधी यांनी संकटाच्या काळात पक्षाचे नेतृत्व केलेले आहे. कठीण काळात म्हणजे २००४ आणि २००९ मध्ये दोन वेळा काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने पक्षाचे नेतृत्व करणे अवघड होईल. (वृत्तसंस्था)
राजकारणातही ब्रँड इक्विटी असते
राजकारणातही ब्रँड इक्विटी असते. जर आपण सध्या भाजपकडे पाहिले, तर मोदी आणि शहा यांच्याशिवाय पक्ष व्यवस्थित चालू शकतो? काँग्रेस पक्षातही गांधी कुटुंबच आमची ब्रँड इक्विटी आहे. हे एक कठोर वास्तव आहे.
काश्मिरातील कलम ३७० हटविल्याच्या मुद्यावर चौधरी म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशाचे राज्यांमध्ये रूपांतर झालेले आम्ही पाहिले आहे; पण एखाद्या राज्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
काँग्रेसला व्यापक समर्थन
आगामी काळात प्रादेशिक पक्षांचे महत्त्व कमी होईल, असे सांगतानाच व्यापक समर्थन असलेल्या काँग्रेसला उज्ज्वल भवितव्य आहे, असा आशावाद काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केला.