‘आदित्य’यान झेपावले अन् इस्रो प्रमुखांना कॅन्सरचे निदान; आजारातून सावरत असल्याचे केले स्पष्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 07:59 AM2024-03-05T07:59:10+5:302024-03-05T07:59:49+5:30

खुद्द सोमनाथ यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे...

'Aditya' launches and ISRO chief diagnosed with cancer; It is clear that he is recovering from illness | ‘आदित्य’यान झेपावले अन् इस्रो प्रमुखांना कॅन्सरचे निदान; आजारातून सावरत असल्याचे केले स्पष्ट 

‘आदित्य’यान झेपावले अन् इस्रो प्रमुखांना कॅन्सरचे निदान; आजारातून सावरत असल्याचे केले स्पष्ट 

नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्त्वाकांक्षी आदित्य-एल१चे २ सप्टेंबर रोजी यशस्वी प्रक्षेपण झाले. त्यानिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना त्याच दिवशी इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कर्करोगाचे निदान झाले. खुद्द सोमनाथ यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली.

‘’चंद्रयान-३ मोहिमेपासून मला आरोग्याच्या काही तक्रारी सुरू झाल्या, परंतु त्यावेळी नेमके काही स्पष्ट झाले नव्हते. पोटदुखीचा त्रास सुरू असल्याने आदित्य-एल१च्या प्रक्षेपणानंतर सायंकाळी मी तपासणीसाठी रुग्णालयात गेलो, तेव्हा चाचणीत पोटाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. पुढील उपचारासाठी मी चेन्नईला गेलो, तिथे शस्त्रक्रिया करण्यात आली, किमोथेरपी झाली. कर्करोगाचे निदान होणे माझ्यासह कुटुंबासाठी धक्कादायक होते. 

सध्या मी आजार समजून घेऊन उपचार घेत आहे. या काळात इस्रोच्या सहकाऱ्यांनी मला बरीच हिंमत दिली. आता मी कर्करोगातून बऱ्यापैकी सावरलो आहे. त्यामुळे फारशी चिंता करण्याची आवश्यकता नाही,’’ असे सोमनाथ यांनी मुलाखतीत सांगितले.

अनेक यशस्वी मोहिमांचे नेतृत्व 
- एस. सोमनाथ यांच्या कार्यकाळात इस्रोने अनेक यशस्वी मोहिमा राबविल्या. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान-३ यशस्वीरित्या लँडिंग करण्याची किमया भारताने पहिल्यांदाच केली. त्यानंतर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य-एल१ चे यशस्वी प्रक्षेपण केले. 
- पृथ्वीपासून १५ लाख किमी अंतरावर असलेल्या लॅग्रेंज पॉइंटवरून आदित्य एल१ सूर्याचा अभ्यास करणार आहे. यानंतर इस्रोने गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणाची तयारी सुरू केली आहे.

शस्त्रक्रियेनंतर पाचव्या दिवशी कार्यालयात
कर्करोगातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो, परंतु मी त्यातून पूर्ण बरा होईन, असा विश्वास आहे. शस्त्रक्रिया व किमोथेरपीसाठी मी केवळ ४ दिवस रुग्णालयात होतो, त्यानंतर पाचव्या दिवशी मी इस्रोत कामावर रुजू झालो. परंतु नियमित आरोग्य तपासणी व औषधोपचार सुरू आहे, असे सोमनाथ यांनी सांगितले. 
 

Web Title: 'Aditya' launches and ISRO chief diagnosed with cancer; It is clear that he is recovering from illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.