"अयोध्या दौरा राजकीय नाही, मग जागोजागी पोस्टर कशासाठी?"; आदित्य ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 02:01 PM2022-06-15T14:01:32+5:302022-06-15T14:02:29+5:30
आदित्य ठाकरे लखनौत उतरताच शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन
Aaditya Thackeray Ayodhya Visit : अयोध्या दौरा हा राजकीय नाही तर हा श्रद्धेचा विषय आहे. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मी अयोध्येत आलो आहे. ही राजकारणाची नव्हे तर रामराज्याची भूमी आहे, असे प्रतिपादन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे लखनौमधून अयोध्येकडे रवाना झाले. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. या मुद्द्यावरून हनुमानगढ़ीचे महंत राजू दास यांनी आदित्य ठाकरेंना कात्रीत पकडणारा प्रश्न विचारला.
आदित्य ठाकरे जेव्हा लखनौ विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांकडून फुलांच्या पायघड्या घालण्याच आल्या आणि त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी कार्यकर्त्यांना पक्षाच्या आणि नेत्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. तसेच शिवसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या प्रकारावरून आदित्य ठाकरेंना सवाल करण्यात आला. "शिवसेना नेते आदित्य ठाकरे म्हणतात की हा राजकीय दौरा नाही. पण मग अयोध्येच्या रस्त्यांवर त्यांची एवढी पोस्टर लागली आहेत. घोषणाबाजी सुरू आहे, त्याचं काय? हिंदुत्वाच्या भूमिके विषयीच्या प्रश्नाचंही उत्तर द्यावं लागेल", असे सवाल हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी आदित्य ठाकरेंना केले.
आदित्य ठाकरे काय म्हणाले...
"आम्ही २०१८ मध्ये अयोध्येत आलो होते तेव्हा 'आधी मंदिर, मग सरकार' असं म्हणालो होतो. त्यानुसार आता मी आज आशीर्वाद घ्यायला आणि प्रार्थना करायला आलो आहे. ही भूमी राजकीय आखाड्याची नाही. ही रामराज्याची भूमी आहे. त्यामुळे येथील मंदिरात गेल्यावर मी कोणतेही मागणे मागण्यापेक्षा आशीर्वाद घेतो आणि मला जे काही देवाने दिले आहे किंवा सेवा करण्याची संधी दिली आहे, त्यासाठी देवाचे धन्यवाद मानतो. आमचे राजकारण समाजकार्यासाठी असते. आमच्या हातून चांगेल कार्य व्हावे, अशी प्रार्थना करत असतो. त्यामुळे हा राजकीय दौरा नसून श्रद्धेचा विषय आहे", अशी आदित्य ठाकरे म्हणाले.