अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी मुख्यमंत्री योगींकडून जागा मागणार- आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 06:19 PM2022-06-15T18:19:33+5:302022-06-15T18:21:04+5:30
आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर
Aaditya Thackeray Ayodhya Visit: अयोध्या दौरा हा राजकीय नाही तर हा श्रद्धेचा विषय आहे, असे सांगत शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडीचे मंत्री आदित्य ठाकरे प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येत दाखल झाले. ही राजकारणाची नव्हे तर रामराज्याची भूमी आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. आदित्य ठाकरे लखनौमधून अयोध्येकडे रवाना झाले, त्यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला आणि मोठ्या प्रमाणावर जयघोष केला. यावेळी बोलताना, अयोध्येत 'महाराष्ट्र सदन'साठी जागा मागणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
"मी चौथ्यांदा अयोध्येत येत आहे. राम मंदिर बनतंय याचा आनंद आहे. त्यामुळे उत्साह व जल्लोष आहे. आम्ही पहिले मंदिर, मग सरकार अशी घोषणा केली होती. आता ते मंदिर तयार होतंय याचा अभिमान वाटतो. इथे आम्ही सर्व जण राजकारण करायला नव्हे तर रामलल्लाचे दर्शन घ्यायला आलो आहोत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून चर्चा होणार आहे. अयोध्येमध्ये महाराष्ट्र सदनसाठी जागा मागण्यासंदर्भात ही चर्चा असणार आहे. सुमारे १०० खोल्यांचे हे भवन अयोध्येत बनवण्याचा आमचा विचार आहे", अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
"अयोध्येची भूमी अतिशय पवित्र आहे. शिवसेना हे एक खूप मोठं कुटुंब आहे. हे कुटुंब आज अयोध्येत आलं आहे. हजारोंच्या संख्येने सारे लोक येथे जमा झाले आहेत. शिवसेनेचं हिंदुत्व सर्वांना माहित आहे. आम्ही दिलेलं वचन पूर्ण करतो. आम्ही अयोध्येत आस्था आहे म्हणून आलो आहे. आम्ही येथे दर्शनासाठी आलो आहोत. कोविड काळात देशातील सर्व लोकांना राज्यात प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे आमचंही येथे जंगी स्वागत झालं. येथेही प्रत्येकाच्या हृदयात शिवसेना आहे", असे आदित्य ठाकरे म्हणाले.