आदित्यनाथ हे मोदी नंबर 2- सरेशवाला
By admin | Published: April 26, 2017 11:42 AM2017-04-26T11:42:04+5:302017-04-26T11:43:42+5:30
मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठाचे कुलगुरू जफर युनूस सरेशवाला योगी आदित्यनाथ हे मोदी नंबर 2 असल्याचे म्हणाले आहेत.
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 26 - मौलाना आझाद राष्ट्रीय ऊर्दू विद्यापीठाचे कुलगुरू जफर युनूस सरेशवाला योगी आदित्यनाथ हे मोदी नंबर 2 असल्याचे म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणत्याही व्यक्तीला निवडण्याची अलौकिक शक्ती आहे. त्यामुळेच योगी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे, असंही वक्तव्य सरेशवाला यांनी केलं आहे. जाजमऊ येथील एका आयोजित कार्यक्रमात सरेशवाला बोलत होते.
ते म्हणाले, मुस्लिमांनी काही गोष्टी मनावर घेऊ नयेत. त्या धारणेतून मुस्लिमांनी बाहेर पडायची गरज आहे, मुस्लिम समाजाला त्यांच्या राजकीय ताकदीचे भान नसल्याचंही सरेशवाला म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भगवे कपडे परिधान केलेल्या योगी आदित्यनाथ यांची मी भेट घेतली होती. तेव्हा उत्तर प्रदेशमधील मुस्लिमांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरल्याचं मी त्यांच्या कानावर घातले होते. त्यावेळी मुस्लिमांना कोणतीही भीती नाही. उत्तर प्रदेशातील प्रत्येक घरात वीज पोहोचणार असून, उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आणि मुस्लिम दुश्मनी न करता सलोख्यानं राहतील. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनात कधीच नसतो. भाजपाला उत्तर प्रदेशात 40 टक्के मतदान झालं असून, त्यामधील 20 टक्के मुस्लिम, तर 40 टक्के हिंदूंनी मतदान केले नसल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं.
2002 नंतर गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही तरीही अद्यापही 2002च्या दंगलीच्या आठवणींना उजाळा देऊन मोदींवर टीका केली जाते. 1969मध्ये अहमदाबादच्या दंगलीत 5 हजार मुस्लिम जिवानिशी गेले होते. त्यानंतर 1985, 87 आणि 92 मध्येही दंगली झाल्या होत्या. त्या काळात देशात काँग्रेसची सत्ता होती. एके काळी गुजरातमध्ये धार्मिक दंगलीमुळे 5-5 महिने शाळा बंद ठेवल्या जायच्या. 1993च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत झालेल्या दंगलीत 1050 मुस्लिम मारले गेले होते. गुजरात दंगलीप्रकरणी 86 हिंदूंना जन्मठेप झाली, असे याआधी कधीच झाले नव्हते. 70 वर्षांपासून दुस-याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवली जात होती. सोनिया गांधी, ममता, लालू आणि मुलायम या नेत्यांनी मुस्लिम लीडरशिप कधी निर्माण होऊ दिली नाही, असा हल्लाबोल करत 25 कोटी मुस्लिम मागे राहिले तर देशाची प्रगती होणार नाही, असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते. त्यामुळे आता आपलं म्हणणं मांडण्यासाठी आपल्याला योग्य लोकांना निवडून द्यावे लागेल, असं आवाहनही सरेशवाला यांनी केलं.