आदित्यनाथ यांचे ‘भाजपा’विरोधात बंड?
By Admin | Published: January 29, 2017 12:11 AM2017-01-29T00:11:27+5:302017-01-29T00:11:27+5:30
गोरखपूरमधून सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांचा भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ‘स्टार प्रचारक’ म्हणून समावेश
लखनऊ : गोरखपूरमधून सलग पाच वेळा लोकसभेवर निवडून गेलेले ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांचा भाजपाने उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत ‘स्टार प्रचारक’ म्हणून समावेश केल्यानंतर त्यांनी स्थापन केलेल्या ‘हिंदू युवा वाहिनी’ या संघटनेने भाजपाविरुद्ध उमेदवार जाहीर करून बंडाचे निशाण उभारले आहे.
गोरखनाथ मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या योगी आदित्यनाथ यांचा खास करून पूर्व उत्तर प्रदेशच्या जिल्ह्यांमध्ये प्रभाव आहे. तो लक्षात घेऊनच भाजपाने त्यांना आगामी निवडणुकीसाठी ‘स्टार प्रचारक’ केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी व राजनाथ सिंग यांच्याखेरीज पक्षाने आदित्यनाथ यांनाच प्रचारात उतरविले होते व त्यांना हेलिकॉप्टरही दिले होते.
परंतु आदित्यनाथ यांनी सन २००२ मध्ये स्थापन केलेली हिंदु युवा वाहिनी भाजपावर नाराज असून पक्षाने त्यांच्या मातब्बरीच्या तुलनेत स्थान न देऊन आदित्यनाथ यांचा अपमान केला आहे, असा या संघटनेचा आरोप आहे.
हिंदु युवा वाहिनीने पूर्व उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या विरोधात ६४ उमेदवार ‘अपक्ष’ म्हणून उभे करण्याचे ठरविले आहे, असे या वाहिनीचे राज्य प्रमुख सुनील सिंग यांनी सांगितले. कुशीनगर आणि महाराजगंज या दोन जिल्ह्यातील सहा उमेदवारही जाहीर केले. बाकीचे उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
पक्षाने योगी आदित्यनाथ यांचा कसा अपमान केला याचा पाढा वाचताना सुनील सिंग म्हणाले: योगीजींना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे, अशी पूर्व उत्तर प्रदेशवासियांची मागणी होती. परंतु पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले. (वृत्तसंस्था)
पक्षाने मोहिनी घातली!
हिंदू युवा वाहिनीने उमेदवार उभे करण्याविषयी योगी आदित्यनाथ यांनी भाष्य करण्यास नकार दिला. संघटनेने हा निर्णय घेण्यापूर्वी आदित्यनाथ यांची संमती घेतली आहे का, असे विचारता सुनिल सिंग यांनी जे उत्तर दिले त्यावरून संमती घेतली नसल्याचे सूचित झाले.