आदित्याय नम:...; भारताचे यान सूर्याकडे झेपावले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 06:37 AM2023-09-03T06:37:08+5:302023-09-03T06:37:15+5:30
सूर्याच्या संशोधनासाठी भारताची ही पहिली मोहीम आहे.
बंगळुरू : चंद्रयान-३च्या यशानंतर अवघ्या नऊ दिवसांनी शनिवारी इस्रोचे आदित्य-एल१ सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात झेपावले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून पीएसएलव्ही-सी५७च्या एक्सएल प्रकारातील अग्निबाणाद्वारे आदित्य- एल१चे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले. सूर्याच्या संशोधनासाठी भारताची ही पहिली मोहीम आहे.
काय अभ्यास करणार?
सूर्यापासून किरणोत्सर्ग होतो. त्यातील विकिरणांना रोखण्याचे काम पृथ्वीचे वातावरण व तिचे चुंबकीय क्षेत्र करते. या किरणोत्सर्गाचा तसेच सूर्याचा कोरोना तसेच सौरवायू यांचा अभ्यास करण्यात येणार. १५ लाख किमी अंतरावर एल-१ हा पॉइंट आहे. सूर्याच्या ग्रहणाचा परिणाम जाणवत नसल्याने त्या भागातून सूर्यावर अहोरात्र लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
इस्रोचे अभिनंदन. मानव कल्याणासाठी विश्वाबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याकरिता सुरू असलेले आमचे वैज्ञानिक प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान