देवयानींविरुद्ध प्रशासकीय कारवाई
By admin | Published: December 21, 2014 02:17 AM2014-12-21T02:17:34+5:302014-12-21T02:17:34+5:30
देवयानी खोब्रागडे (४०) यांच्याविरुद्ध आता परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘सक्तीच्या प्रतीक्षे’ची शिस्तभंग आणि प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : गेल्या वर्षी अमेरिकेत बनावट व्हिसाप्रकरणी अटक झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भारतीय मुत्सद्दी देवयानी खोब्रागडे (४०) यांच्याविरुद्ध आता परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘सक्तीच्या प्रतीक्षे’ची शिस्तभंग आणि प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. तथापि, आपण कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचा खुलासा देवयानी यांनी केला आहे.
देवयानी खोब्रागडे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सूचना न देताच आपल्या मुलांसाठी अमेरिकन व्हिसा मिळविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे आणि देवयानी यांची ही कृती ‘आचार नियमांचा भंग’ करणारी असल्याचे या चौकशीत आढळून आल्यामुळेच त्यांच्यावर शिस्तभंगासोबत प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. तथापि , या कारवाईचे निश्चित स्वरूप काय आहे, याचा मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.
दरम्यान, परवानगीशिवाय माध्यमाला मुलाखत दिल्याबद्दलही परराष्ट्र मंत्रालयाने देवयानी यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. मंत्रालयाने देवयानी यांना ‘सक्तीच्या प्रतीक्षा श्रेणीत’ ठेवल्याचे समजते. अमेरिकेहून परतल्यानंतर देवयानी या परराष्ट्र मंत्रालयात डेव्हलपमेंट पार्टनरशीप डिव्हिजनमध्ये संचालिका पदावर कार्यरत होत्या.
‘सेवा नियमानुसार अज्ञान मुलांचे दोन पासपोर्ट असू शकतात आणि त्यात काहीही गैर नाही’, असे सांगून देवयानी यांनी आपल्या मुलींसाठी अमेरिकन पासपोर्ट घेण्याच्या कृतीचे समर्थन केले. मीडियाला मुलाखत देणे सेवा नियमांच्या कक्षेतच आहे; परंतु तुमचे मत व्यक्तिगत असले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
कारवाईचे कारण
‘माझ्या मुलांचा जन्म अमेरिकेत झाला आणि त्यांना आता अमेरिकन नागरिक मानले जाते’, असे देवयानी खोब्रागडे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला आणि कारवाई केली. मुले अमेरिकन नागरिक आहेत, याचा अर्थ त्यांच्याजवळ अमेरिकन पासपोर्ट आहे; पण अमेरिकन पासपोर्ट असल्याची माहिती खोब्रागडे यांनी परराष्ट्र मंत्रालयापासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे.
आपण कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. न्यूयॉर्कमधील आपल्या अटकेबाबत आपण मीडियाकडे केलेले वक्तव्य पूर्णत: व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. आपण अमेरिका-भारत संबंधावरही भाष्य केले नाही. त्यामुळे आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
-देवयानी खोब्रागडे, भारतीय मुत्सद्दी