नौदलाच्या पूर्व ताफ्याची सूत्रे अॅडमिरल भोकरेंकडे
By admin | Published: October 7, 2015 03:42 AM2015-10-07T03:42:38+5:302015-10-07T03:42:38+5:30
विशाखापट्टण नौदल तळावर मंगळवारी सकाळी झालेल्या शानदार समारंभात रिअर अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या ध्वजाधिकारीपदाची सूत्रे रिअर
नवी दिल्ली : विशाखापट्टण नौदल तळावर मंगळवारी सकाळी झालेल्या शानदार समारंभात रिअर अॅडमिरल एस. व्ही. भोकरे यांनी भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याच्या ध्वजाधिकारीपदाची सूत्रे रिअर अॅडमिरल ए.बी. सिंग यांच्याकडून स्वीकारली. याआधी अॅडमिरल भोकरे नौदलाच्या पाणबुडी दळाचे ध्वजाधिकारी होते. अॅडमिरल सिंग आता दिल्लीत ‘स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड’च्या मुख्यालयात काम पाहतील.
पूर्व ताफ्याचे ध्वजाधिकारी या नात्याने भारतीय नौदलातील विविध प्रकारच्या ३० युद्धनौकांची प्रशासकीय तसेच डावपेचात्मक जबाबदारी रिअर अॅडमिरल भोकरे यांच्याकडे असेल. यात विनाशिका, आवाज न करता वावरणाऱ्या फ्रिगेट्स, लढाऊ युद्धनौका, पाणबुड्यावेधी युद्धनौका, सागरी गस्ती नौका, क्षेपणास्त्रधारी युद्धनौका व टँकर यांचा समावेश आहे. रिअर अॅडमिरल भोकरे नॅव्हिगेशन व एअरक्राफ्ट डायरेक्शन या विषयातील तज्ज्ञ असून ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे पदवीधर आहेत.
त्यांनी महू येथील आर्मी वॉर कॉलेजमध्ये ‘हायर कमांड’ अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. याखेरीज अॅडमिरल भोकरे यांनी कॅनबेरा येथील आॅस्ट्रेलियन डिफेन्स कॉलेजमधून ‘डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज’ या विषयात पदव्युत्तर पदवीही घेतली आहे. (विशेष प्रतिनिधी)