आग दुर्घटना; पीडित कुटुंबातील मुलींना दत्तक घेतले, शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:06 PM2019-12-11T15:06:30+5:302019-12-11T15:07:50+5:30
दिल्ली धान्य बाजारात झालेल्या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना
नवी दिल्ली - दिल्लीतील झंडेवालान भागातील अनाज मंडीतील चार मजली इमारतीला पहाटे लागलेल्या भीषण आगीत 43 जणांना प्राण गमवावे लागले तर 14 जण जखमी झाले. या इमारतीचा मालक रेहानला पोलिसांना सायंकाळी अटक केली. घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी या दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन पक्षातर्फे त्यांना आर्थिक मदत जाहीर केली.
दिल्ली धान्य बाजारात झालेल्या अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या व जखमी झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शरद पवार यांच्या उपस्थितीत 10 लाख रूपयांची मदत देण्यात आली. शरद पवार यांनी व्यक्तीशः 5 लाख रुपयांचा धनादेश नातेवाईकांना दिला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने जखमी व मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील मुलींना दत्तक घेतले आहे. तसेच, त्यांच्या शिक्षणाचा खर्चही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहन, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के.जे. ज्योसमान हेही पवारांसमवेत हजर होते. दरम्यान, केंद्र सरकारनेही पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.
दिल्लीतील धान्य बाजार येथे रविवारी पहाटे 5 वाजून 22 मिनिटांनी आगीची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी धावले. 60 बंबांनी चहुबाजुंनी हा परिसर घेरला होता, मात्र अरूंग गल्लीमुळे मदतकार्यात खूप अडथळे आले. सलग चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. बचावकार्य करताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. एका मजल्यावरील कारखान्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इमारतीत 60 पेक्षा अधिक लोक होते. त्यापैकी 43 जण मरण पावल्याचे पोलिस व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीचे लोळ चहुबाजूने येत असल्याने कामगारांना इमारतीतून बाहेर पडणे मुश्किल झाले. या आगीच्या धुराने अनेक जण बेशुद्ध झाले.