अडवाणींचे पुन्हा टीकास्त्र
By admin | Published: June 29, 2015 12:10 AM2015-06-29T00:10:48+5:302015-06-29T00:10:48+5:30
नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगत लालकृष्ण आडवाणींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.
नवी दिल्ली : देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करून केंद्रातील रालोआ सरकार आणि भाजपला अडचणीत टाकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगून अडवाणी यांनी ललितगेट प्रकरणात आरोप लावण्यात येत असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना अप्रत्यपणे राजीनामा देण्याचा सल्ला दिला.
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्यावरून स्वराज व राजे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरीत असतानाच अडवाणी म्हणाले की, ‘सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक आहे. हवाला कांडात माझे नाव गोवण्यात आले त्यावेळी मी लगेच पदाचा राजीनामा दिला होता.’ एका दैनिकाला मुलाखत देताना अडवाणी बोलत होते. ‘१९९६ मध्ये हवाला कांडप्रकरणी माझ्याविरुद्ध आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी मी खासदारकीचा राजीनामा दिला होता. हे आरोप खोटे ठरल्यानंतर मी परत संसदेत आलो,’ असे ते म्हणाले.
‘जेव्हा जैन डायरीच्या आधारावर हवाला कांड प्रकरणात माझ्याविरुद्ध आरोप लावण्यात आले होते, तेव्हा पंडारा मार्गावरील आपल्या निवासस्थानी बसलेला असताना सायंकाळी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी तात्काळ अटलबिहारी वाजपेयी यांना फोन करून आपला निर्णय कळविला. त्यांनी मला राजीनामा देऊ नका, अशी सूचनाही केली. जनता निवडणुकीत आम्हाला मतदान करते. त्यामुळे जनतेप्रती प्रतिज्ञाबद्धता असणे आवश्यक आहे,’ असे अडवाणी यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्वराज आणि राजेंनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे -काँग्रेस
हवाला घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगून लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या मंत्र्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वराज आणि राजे यांनीही आपापली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे काँग्रेसचे नेते पी.सी. चाको म्हणाले.
४राजीनामा देण्याचा नियम असला पाहिजे का, असे विचारले असता अडवाणी म्हणाले की, मी माझ्याबाबतीत सांगू शकतो. दुसरे काय करतात, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा काय मुद्दा आहे, हे मला ठाऊक नाही. जनसंघाच्या आधीपासूनच संघाच्या शाखांमधून आम्हाला प्रामाणिकपणाचे धडे दिले जात होते आणि प्रामाणिकपणा हाच सर्वांत मोठा सद्गुण असल्याचे सांगण्यात येत होते. भ्रष्टाचाराबाबत कसलाही समझोता केला जाऊ नये.
सत्तारूढ भाजप राजकीय नीतिमत्ता व प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालण्यास तयार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अडवाणी यांनीही याबाबत सावध केले आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांना वाचवायचे आहे. कारवाई केली तर ही प्रक्रिया आणखी वेग घेईल, अशी भाजपला भीती वाटत आहे.
-नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार