अडवाणी यांनी केजरीवालांना भेटण्याचे टाळले
By admin | Published: June 20, 2015 12:50 AM2015-06-20T00:50:39+5:302015-06-20T00:50:39+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी होऊ घातलेली भेट रद्द झाली आहे आणि ही भेट रद्द होण्यामागे
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी होऊ घातलेली भेट रद्द झाली आहे आणि ही भेट रद्द होण्यामागे भाजपचा हात आहे किंवा काय, याबाबतच्या चर्चेला आता पेव फुटले आहे.
देशात पुन्हा आणीबाणीची शक्यता नाकारता येत नाही, असे विधान अडवाणी यांनी गुरुवारी केले होते आणि अन्य विरोधी पक्षनेत्यांप्रमाणेच केजरीवाल यांनीही त्याबाबत सहमती दर्शविली होती. त्यानंतर केजरीवाल यांनी अडवाणी यांना भेटीसाठी वेळ मागितला होता. अडवाणी यांची व्यस्तता आणि त्यांचे काही पूर्वनिर्धारित कार्यक्रम ठरलेले असल्याकारणाने ते मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाहीत, असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचे केजरीवाल यांच्या कार्यालयातील सूत्रांनी म्हटले आहे.
ही बैठक पुढच्या आठवड्यात कोणत्याही वेळेला होऊ शकेल. कारण अडवाणी हे शनिवार आणि रविवारी दिल्लीबाहेरच आहेत, असेही त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसह अन्य काही मुद्यांवर अडवाणींसोबत चर्चा करण्याची केजरीवाल यांची इच्छा असल्याचे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)