आडवाणींविरुद्धच्या बाबरी खटल्याचा फैसला मेपूर्वी?
By admin | Published: March 23, 2017 12:49 AM2017-03-23T00:49:13+5:302017-03-23T00:49:13+5:30
लालकृष्ण आडवाणी, उमा भारती यांच्यासह भाजपा व संघ परिवारातील अनेक ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध बाबरी मशिद पाडली
नवी दिल्ली : लालकृष्ण आडवाणी, उमा भारती यांच्यासह भाजपा व संघ परिवारातील अनेक ज्येष्ठ नेत्यांविरुद्ध बाबरी मशिद पाडली जाण्याच्या संदर्भात फौजदारी कट कारस्थानाचा खटला चालवायचा की नाही यावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्याआधी होण्याचे संकेत बुधवारी मिळाले.
सत्र न्यायालयाने या नेत्यांविरुद्धचा कट कारस्थानाचा आरोप काढून टाकला होता व अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानही नंतर हा निर्णय कायम केला होता. सीबीआयने याविरुद्ध केलेले अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
हे अपील ६ मार्च रोजी न्या. पी. सी. घोष व न्या. रोहिंग्टन नरिमन यांच्या खंडपीठापुढे आले, तेव्हा आम्ही कट कारस्थानाचा आरोप पुन्हा ठेवण्याचा विचार करू, असे न्या. नरिमन यांनी बोलून दाखविले होते.
बुधवारी हे अपील न्या. घोष व नव्याने नियुक्त झालेले न्या. दीपक गुप्ता या वेगळ््याच खंडपीठापुढे सुनावणीसाठी येणार असल्याचे बोर्डावर दाखविले गेले. यावरून ही सुनावणी करणारे खंडपीठ ऐनवेळी बदलले असा अर्थ काढून त्यावरून तर्कवितर्कही सुरू झाले.
प्रत्यक्षात न्या. घोष व न्या. गुप्ता यांच्यापुढे प्रकरण पुकारले गेले, तेव्हा खंडपीठ बदललेले नाही व सुनावणी आधी ठरलेल्या खंडपीठापुढेच होईल हे स्पष्ट झाले. हे प्रकरण ‘पार्टहर्ड’ आहे. खंडपीठावरील माझे सहकारी (न्या. नरिमन) आज (उपलब्ध) नसल्याने सुनावणी तहकूब करावी लागेल, असे न्या, घोष म्हणाले.
यावर आडवाणी यांच्या वतीने उभे राहिलेले ज्येष्ठ वकील के. के. वेणुगोपाळ यांनी सुनावणी चार आठवडे तहकूब करण्याची विनंती केली. तसे केले तर मग सुनावणी मे महिन्यात जाईल, असे म्हणून न्या. घोष यांनी ही विनंती ्मान्य करून सुनावणी उद्या २३ मार्च रोजी घेण्यात येईल, असे सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)