ऐन दुष्काळात मटक्याचा झटका

By Admin | Published: April 8, 2016 12:02 AM2016-04-08T00:02:42+5:302016-04-08T00:05:00+5:30

शिवराज बिचेवार, नांदेड दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असताना, अवैध इमानदारीचा व्यवसाय असलेल्या मटक्याचा झटका मात्र तेजीत आहे़

An aerial shock | ऐन दुष्काळात मटक्याचा झटका

ऐन दुष्काळात मटक्याचा झटका

googlenewsNext

शिवराज बिचेवार,  नांदेड
दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असताना, अवैध इमानदारीचा व्यवसाय असलेल्या मटक्याचा झटका मात्र तेजीत आहे़ ऋतु कोणताही असो, परिस्थिती काहीही असो परंतु कल्याण-मिलनच्या या खेळावर नियंत्रण ठेवण्यात पोलिस यंत्रणेला अपयश येत असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त होत आहेत़
जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून मटक्याचा हा व्यवसाय सुरु आहे़ या अवैध धंद्याबाबत थोडा गाजावाजा झाला की, लगेच पोलिस प्रशासनाकडून किरकोळ बुकीवर कारवाई करुन आपली पाठ थोपटण्यात येते़ परंतु या व्यवसायाचे बडे मासे मोकळेच राहतात़ त्यात अशा कारवाईनंतर प्रत्यक्षात पुन्हा फायदा पोलिसांचाच होत असल्याचेही बुकीचे म्हणणे आहे़ नांदेड शहरात लोकमत चमुने पाहणी केली असता, सर्वच ठिकाणी मटक्याचे अड्डे राजरोसपणे सुरु असल्याचे पहावयास मिळाले़ शहरातील शिवाजीनगर भागात एका टपरीवर काही मिनिटांच्या अवधीने चोरट्या पावलाने एक-एक जण येत होता़ अन् आपले आकडे सांगून निघून जात होता़
असाच प्रकार गोकुळनगर, अण्णाभाऊ साठे चौक, गणेशनगर वाय पॉर्इंट, जयभीनगर, नवी आबादी, तेहरानगर आदी परिसरात पहायला मिळाला़ प्रत्येक ठिकाणी पानटपरी, छोटे किराणा दुकान, टेलरिंगचे दुकान, केश कर्तनालय, चहाची टपरी या ठिकाणी सर्रासपणे मटका स्विकारला व लावला जात असल्याचे पहावयास मिळाले़ शहरात आजघडीला अशाप्रकारचे २०० हून अधिक मटक्याचे अड्डे असल्याचे आढळले़ झोपडपट्टी भागात मटक्याचे व्यसन अनेकांना असल्याचे दिसत आहे़ १५० ते २०० रुपये रोजंदारीवर काम करणारे बहुतेक मजूर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दिवसातून एक तरी, आकडा लावून नशीब आजमावित असल्याचे दिसून येते़ परंतु दिवसेंदिवस झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कुटुंबे उद्धवस्त झाली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनाही मटका बुकींची इत्यंभूत माहिती असते़
अवैध व्यवसायातही आधुनिकता
आजघडीला सर्वत्र मोबाईल, इंटरनेटचा वापर करण्यात येत आहे़ मटक्याच्या अवैध व्यवसायातही मोबाईल आणि इंटरनेटमुळे मटका बुकी आणि ग्राहकांची मोठी सोय झाली आहे़ यापूर्वी आपण लावलेला आकडा आला की नाही? किंवा तो लावण्यासाठी मटका बुकींकडे जावे लागत होते़ परंतु आता मोबाईलवरुन मटका स्विकारणे आणि लावणे सुरु आहे़ त्याचबरोबर इंटरनेटवर बसून कुठेही नेमका कोणता आकडा आला अन् किती रुपयांचा आला याचीही माहिती मिळत आहे़
कल्याण-मिलन
जिल्ह्यात दुष्काळामुळे एक-एक व्यवसाय बंद पडत आहेत़ बाजारात आर्थिक उलाढाल नसल्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत़ शेतकऱ्यांनी तर कर्जाला कंटाळून आत्महत्येसारखा मार्ग स्विकारला आहे़ अशा परिस्थितीत अवैध इमानदारीचा हा धंदा मात्र तेजीत आहे़ गल्ली बोळासह उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातही आता धंद्याने पाय पसरले आहेत़ पोलिस प्रशासन जोपर्यंत गंभीरपणे अशा जुगाऱ्यांवर कारवाई करणार नाही तोपर्यंत या व्यवसायाचे समुळ उच्चाटन होणे शक्य नाही़

Web Title: An aerial shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.