Afghanistan Crisis: भीषण स्फोटांचे आवाज, बसवर बेछूट गोळीबार; अफगाणिस्तानातून परतलेल्यांनी सांगितली थरकाप उडवणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 09:54 AM2021-08-22T09:54:15+5:302021-08-22T09:55:48+5:30

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातील परिस्थिती याचि देही याचि डोळा पाहणाऱ्यांनी कथन केला थरारक अनुभव

Afghanistan Crisis 4 from Dehradun Dodged Taliban In Afghanistan To Reach Delhi | Afghanistan Crisis: भीषण स्फोटांचे आवाज, बसवर बेछूट गोळीबार; अफगाणिस्तानातून परतलेल्यांनी सांगितली थरकाप उडवणारी कहाणी

Afghanistan Crisis: भीषण स्फोटांचे आवाज, बसवर बेछूट गोळीबार; अफगाणिस्तानातून परतलेल्यांनी सांगितली थरकाप उडवणारी कहाणी

googlenewsNext

देहरादून: दीपक कुमार १३ ऑगस्टला सकाळी कामावर निघाले. आपलं काबुलमधील घर ते शेवटचं पाहताहेत हा विचारदेखील त्यावेळी त्यांच्या मनात आला नव्हता. घरातून निघाल्यानंतर कुमार एका बसमधून ५० भारतीयांसह विमानतळावर पोहोचले. तिथून ते दुबईला रवाना झाले आणि १३ हजार किलोमीटर अंतर पार करून मायदेशी परतले. या प्रवासात अनेक अडथळे आले. दीपक कुमार यांनी मृत्यू अगदी जवळून पाहिला. काबूलमधील दूतावासात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे दीपक हा प्रवास कधीही विसरू शकणार नाहीत.

तालिबानचे दहशतवादी वेगानं काबुलच्या दिशेनं निघाले होते. देशाची राजधानी इतक्या लवकर तालिबान्यांच्या ताब्यात जाईल अशी कल्पना कोणीही केली नव्हती. मात्र दीपक कुमार कार्यरत असलेल्या ब्रिटिश दूतावासानं सुदैवानं आधीच तयारी करून ठेवली होती. १३ ऑगस्टला दीपक कार्यालयातच पोहोचताच त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ब्रिटिश मालवाहू विमानाची तिकिटं देण्यात आली. ते विमान काही तासांत काबुलहून उड्डाण करणार होतं. त्यासाठी दीपक विमानतळावर जाणाऱ्या बसमध्ये चढले.

लष्करातून निवृत्त झाल्यानंतर दूतावासात सुरक्षेचं काम करत असलेल्या दीपक कुमार यांनी त्यांना आलेला भीषण अनुभव सांगितला. 'आमच्यातील बऱ्याचशा लोकांना आवराआवर करण्यासही वेळ मिळाला नाही. आम्ही बस पकडली. शहरातून बस पुढे सरकत असताना स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. काही तालिबानी दहशतवाद्यांनी बसवर बेछूट गोळीबार केला. सुदैवानं बस बुलेटप्रूफ असल्यानं सर्व सुरक्षित राहिले,' अशी थरारक कहाणी दीपक यांनी सांगितली.

बस शहरातून जात असताना अफगाणी नागरिकांची गर्दी बस थांबवण्याचा प्रयत्न करत होती. आम्हाला देश सोडायचा आहे. आम्हालाही तुमच्यासोबत न्या, असं म्हणत त्यांनी विनवण्या केल्या. त्यात अनेक महिला होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच मी असहाय होतो, अशा शब्दांत दीपक यांनी त्यांचा अनुभव सांगितला. दीपक यांनी काबुलहून दुबई विमानतळ गाठलं. तिथून त्यांचं विमान हिथ्रोला गेलं. १३ हजार किलोमीटर अंतर कापून ते १८ ऑगस्टला दिल्लीला पोहोचले.

Web Title: Afghanistan Crisis 4 from Dehradun Dodged Taliban In Afghanistan To Reach Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.