Afghanistan Crisis: सगळं संपलंय... काबुलहून दिल्लीत उतरताच अफगाणी शीख खासदाराला रडू कोसळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 01:29 PM2021-08-22T13:29:01+5:302021-08-22T13:32:29+5:30
Afghanistan Crisis: गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायु सेनेनेच घेतली.
नवी दिल्ली - अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे, अफगाणिस्तानातील भारतीयांना मायदेशी आणण्याचं मिशन भारतीय हवाई दलानं हाती घेतलेलं आहे. यात भारतीय हवाई दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय हवाई दलाचं सी-१७ विमान आज सकाळी काबुलहून १६८ जणांना घेऊन भारतात दाखल झालं आहे. भारतात दाखल झालेल्या या विमानात हिंदू शीख आणि अफगाणी नागरिकही आले आहेत. त्यापैकीच, एक असलेल्या अफगाणीस्तानच्या शीख खासदाराचे परिस्थितीचं गांभीर्य सांगताना डोळे पाणावले.
गाझियाबादच्या हिंडन एअरबेसवर वायुसेनेचं हे विमान उतरलं आहे. याठिकाणी वायुसेनेकडून सर्व नागरिकांच्या उतरविण्यात आलं असून त्यांची सर्व काळजी वायु सेनेनेच घेतली. या 168 जणांमध्ये अनेक लहान मुलं, महिला आणि अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणाऱ्यांचाही समावेश आहे. या विमानात अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंद्रसिंह खालसा हेही हजर होते. एअरबेसवर विमान उतरताच पत्रकारांनी नरेंद्रसिंह यांच्याशी संवाद साधला. यावेळी, अफगाणिस्तानमधील परिस्थितीसंदर्भात प्रश्न विचारले. त्यावेळी, खासदार खालसा यांना अश्रू अनावर झाले. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 20 वर्षात जे काही झाले होते, ते सर्व संपलं चाललंय. सगळं शुन्यावर यायलंय, अशी माहिती देताना त्यांना हुंदका आवरता आला नाही.
#WATCH | Afghanistan's MP Narender Singh Khalsa breaks down as he reaches India from Kabul.
— ANI (@ANI) August 22, 2021
"I feel like crying...Everything that was built in the last 20 years is now finished. It's zero now," he says. pic.twitter.com/R4Cti5MCMv
काबुलहून आज सकाळी दिल्लीतील हिंडन एअरबेसवर आलेल्या 168 नागरिकांमध्ये 107 भारतीय नागरिकांचा समावेश आहे. तर, काही हिंदू-शीख आणि अफगाणी नागरिकही आहेत. एका अफगाणी महिलेने एएनआयसोबत संवाद साधताना भयंकर आपबिती सांगितली. अफगाणिस्तानमध्ये परिस्थिती अत्यंत खराब आहे, त्यामुळेच मी माझ्या मुलीसह नातवंडांना घेऊन भारतात आले आहे. आपले भारतीय बंधु-भगिनी आमच्या बचावासाठी पुढे सरसावले. तालिबान्यांनी माझं घर जाळलं, भारताने आम्हाला आसरा दिला, त्यासाठी मी भारताचे आभार मानते, असं दु:ख या पीडित महिलेनं सांगितलं.
"Situation was deteriorating in Afghanistan, so I came here with my daughter & two grandchildren. Our Indian brothers & sisters came to our rescue. They (Taliban) burnt down my house. I thank India for helping us," says an Afghan national at Hindon Air Force Station, Ghaziabad pic.twitter.com/Pmh1zqZZCB
— ANI (@ANI) August 22, 2021
८७ प्रवाशांना घेऊन आणखी एक विमान येतंय
वायुसेनेनं सी-१७ विमान भारतात दाखल झाल्यानंतर एअर इंडियाचं एका विमानानं शनिवारी ८७ भारतीयांना घेऊन काबुल विमानतळावरुन उड्डाण केलं आहे. तेही विमान लवकरच भारतात दाखल होणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार कागदपत्रांची पडताळणी आणि काबुल विमानतळ सध्या अमेरिकेच्या ताब्यात असल्यानं संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या २४ तासांत ३९० भारतीयांची काबुलहून सुटका
गेल्या २४ तासांत एकूण ३९० भारतीयांची काबुलहून सुखरूपरित्या सुटका करण्यात आली आहे. आज सकाळी १६८ जणांना घेऊन हवाई दलाचं विमान गाझियाबादमध्ये दाखल झालं आहे. तर ८७ जणांना घेऊन येणारं एअर इंडियाचं विमान आज दिल्ली विमानतळावर दाखल होणार आहे. याआधी १३५ जणांची सुटका करण्यात आली होती. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुखरूपपणे मायदेशी आणण्याकडे भारतीय परराष्ट्र मंत्रालय अतिशय काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.