Afghanistan Crisis: भारत सरकार तालिबानसोबत चर्चा करणार? २० वर्षांनंतर संपर्क साधणार, सूत्रांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 02:01 PM2021-08-25T14:01:20+5:302021-08-25T14:02:19+5:30
Afghanistan Crisis & India: , अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
नवी दिल्ली - अफगाणिस्तानवर तालिबाबने कब्जा केल्यानंतर आता तिथे स्थापन होणारे नवे सरकार आणि त्याच्या धोरणांबाबत चर्चा सुरूझाली आहे. दरम्यान, तालिबान सरकारसोबत भारत सरकार चर्चा करणार का? २० वर्षांनंतर तालिबानसोबतभारत सरकार संपर्क साधणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये नवे सरकार स्थापन झाल्यानंतर देशहिताच्या दृष्टीने सर्व पक्षांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. (Sources said, Will Indian government hold talks with Taliban? Contact after 20 years )
या संदर्भातील वृत् न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. सध्यातरी संपूर्ण जगात अफगाणिस्तानच्या नव्या सरकारला मान्यता देण्याबाबत कुठल्याही देशाने औपचारिक निर्णय घेतलेला नाही. सूत्रांनी न्यूज १८ ला सांगितले की, गजर पडल्यावर तालिबानशी संपर्क साधला जाईल. तसेच चर्चा केली जाईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानमध्ये बदललेली परिस्थिती आणि तालिबानने सत्तेवर केलेला कब्जा विचारात घेऊन भारत सरकार लवकरच या प्रकरणी एक धोरण ठरवणार आहे. त्यानंतर तालिबानसोबत चर्चा केली जाईल. मात्र यापूर्वीही सरकारने तालिबानसोबत संपर्कात असल्याच्या वृत्तांना नकार दिला नव्हता.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये भारताने मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक सरकार असावे, यामध्ये सर्व वर्गांचे प्रतिनिधी असावेत, अशी भारताची अपेक्षा आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणी पांडे यांनी मानवाधिकार परिषदेमध्ये सांगितले की, एक व्यापक प्रतिनिधित्व असलेल्या सरकारला अधिक स्वीकारार्हता आणि वैधता मिळवण्यात मदत होईल. अफगाणी महिलांचा आवाज, अफगाणी मुलांच्या अपेक्षा आणि अल्पसंख्याक समुदायाच्या अधिकारांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच अफगाणिस्तानमधील स्थिरतेचा संबंध हा या प्रदेशातील शांती आमि सुरक्षेशी निगडित आहे. लष्कर आणि जैशसारख्या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करत येता कामा नये.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यात ४५ मिनिटे चर्चा झाली होती. त्या चर्चेमध्ये अफगाणिस्तानमधील परिस्थितीचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला होता. रशियासारखा देशही अमेरिकन सैन्याची माघार आणि अफगाणिस्तानमधील बदल्या परिस्थितीमध्ये भारताची भूमिका महत्त्वपूर्ण राहील असे मानतो, असे सूत्रांनी सांगितले.