Afghanistan Taliban Crisis : तालिबाननं आपला देश स्वतंत्र केला; मुनव्वर राणा यांचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 08:31 PM2021-08-18T20:31:36+5:302021-08-18T20:33:50+5:30
तालिबाननं रविवारी अफगाणिस्तानवर मिळवला होता ताबा. या प्रकरणी कवी मुनव्वर राणा यांनी केलं वादग्रस्त व्यक्तव्य.
अमेरिकेनं आपलं सैन्या माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये पुन्हा तालिबाननं आपले पाय पसवण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, रविवारी अफगाणिस्तानवरतालिबाननं ताबा मिळवला. परंतु यानंतर भारतातूनही अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याचदरम्यान ऊर्दू शायर मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "तालिबाननं योग्य केलं. आपल्या जमीनीवर कशाही प्रकारे कब्जा केला जाऊ शकतो," असं विधान राणा यांनी केलं.
तालिबानच्या दशतवादी नेटवर्कबद्दल बोलताना मुनव्वर राणा यांनी त्यांना दहशतवादी तर तुम्ही त्यांना म्हणत आहात असं म्हटलं. "तुम्ही उघडपणे म्हणता की प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नसतो परंतु प्रत्येक दहशतवादी हा मुसलमान असतो. दहशतवाद्यांची व्याख्या इथे करण्यातच आली नाही, की कोण दहशतवादी आहे आणि कोण दहशतवादी नाही," असं ते म्हणाले. मुनव्वर राणा यांनी नवभारत टाईम्सला दिलेल्या विशेष मुलाखतीत यावर भाष्य केलं. "तालिबान दशतवादी संघटना असू शकते, परंतु जर ते आपल्या देशासाठी लढत आहेत, तर तुम्ही त्यांना दहशतवादी कसं म्हणू शकता," असंही त्यांनी नमूद केलं.
"ज्या देशाशी आपले दीर्घ कालावधीपासून संबंध राहिले असतील किंवा असं म्हणा की कधी तो भारताचाच भाग होता. तालिबानचं जे वागणं आहे त्याला दहशतवादी म्हणू शकत नाही, त्यांना तुम्ही अग्रेसिव्ह म्हणू शकता," असं राणा म्हणाले.
सपा खासदारानंही केलं होतं वादग्रस्त वक्तव्य
भारतातील काही राजकीय नेते तालिबानच्या कारवाईच्या समर्थनात धक्कादायक विधान करताना दिसून आले. यामध्ये समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांच्यासारख्या नेत्यांचाही समावेश आहे. "तालिबानची ही स्वातंत्र्यासाठी लढाई" असल्याचं वादग्रस्त विधान बर्क यांनी केलं आहे. "तालिबान अफगाण नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढाई लढत आहे. अफागाणिस्तानचे स्वातंत्र्य हा त्यांचा मुद्दा आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राज्य का आहे? तालिबान तिथली एक शक्ती आहे आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य हवं आहे," असं देखील त्यांनी म्हटलं होतं.