Afghanistan Taliban: 350 तालिबानी ठार मारल्याचा नॉर्दर्न अलायन्सने केला दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 07:08 AM2021-09-02T07:08:23+5:302021-09-02T07:09:02+5:30
कारवाईत अनेक अमेरिकन वाहने, शस्त्रे हाती लागली आहेत. या आधी मंगळवारी रात्रीदेखील तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आली होती.
नवी दिल्ली : तालिबान एकीकडे जगासमोर शांततेत अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवून ते चालवत असल्याचा दावा करीत आहे तर दुसरीकडे तालिबानी पंजशीर भागात घुसखोरीचा प्रयत्न करीत आहेत. ट्विटरवर नॉर्दर्न अलायन्सने मंगळवारी रात्री खावकमध्ये हल्ला करण्यासाठी आलेल्या ३५० तालिबानींना ठार मारून ४० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले, असा दावा केला आहे.
या कारवाईत अनेक अमेरिकन वाहने, शस्त्रे हाती लागली आहेत. या आधी मंगळवारी रात्रीदेखील तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आली होती. तेथे त्यांचा संघर्ष नॉर्दर्न अलायन्सच्या लढवय्यांशी झाला. स्थानिक पत्रकार नातिक मालिकज़ादाने केलेल्या ट्वीटनुसार अफगाणिस्तानच्या पंजशीरच्या प्रवेशद्वारावर गुलबहार भागात तालिबानी आणि नॉर्दर्न अलायन्सचे लढवय्ये यांच्यात संघर्ष झाला.
एवढेच नाही तर तालिबानने येथे एक पूल उडवून दिल्याचेही वृत्त आहे. याशिवाय अनेक तालिबानींंना पकडल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी रात्री तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्सच्या लढवय्यांत गोळीबार झाला व त्यात ७-८ तालिबानी मारले गेल्याचे वृत्त आहे.
सैन्य मागे घेणे हा चांगला पर्याय होता -बायडेन
अमेरिकेच्या सर्वात दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धाला आणि लष्करी बळाने इतर देशांची पुनर्निर्मिती करण्याच्या दशकांपासून सुरू असलेल्या निरर्थक प्रयत्नांना पूर्णविराम देण्याचा एक चांगला पर्याय होता, अशा शब्दात अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावरून बायडेन सध्या जोरदार टीकेला तोंड देत आहेत.
अफगाणिस्तानातून बाहेर पडताना झालेल्या गोंधळाचे बायडेन यांनी व्यूहरचनेच्यादृष्टीने यश असल्याचे म्हटले. ते म्हणाले की,“काही आठवड्यांपूर्वी जरी ते काम सुरू केले असते तरी असाच गोंधळ झाला असता. अफगाणिस्तानात राहत असताना आणखी अमेरिकन तुकड्यांची गरज पडलीच असती.”
जीवितहानीशिवाय अमेरिकेने काही मिळवले नाही - पुतीन
अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूची जीवितहानी आणि शोकांतिकेशिवाय काही मिळवले नाही आणि इतर देशांवर विदेशी मूल्ये लादणे अशक्य असते हे दाखवून दिले, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटले.“अमेरिकेची लष्करी दले अफगाणिस्तानात २० वर्षे राहिली आणि २० वर्षे त्यांनी तेथे राहणाऱ्या लोकांवर आपली जीवन जगण्याची पद्धत बिंबविण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचा एकच परिणाम झाला तो म्हणजे अमेरिकेची आणि तेथे राहणाऱ्या लोकांची जीवितहानी. दरम्यान, इंग्लंडच्या सरकारने अफगाणिस्तानात असलेले ब्रिटिश नागरिक आणि पात्र अफगाण निर्वासित यांना सुरक्षितरीत्या बाहेर आणता यावे यासाठी तालिबानशी चर्चा सुरू केली आहे, असे बुधवारी डाऊनिंग स्ट्रीटने म्हटले.