Coronavirus: कोरोनानंतर देशापुढे आणखी एक नवं संकट; 'या' आजाराने केला भारतात शिरकाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:34 AM2020-05-04T11:34:08+5:302020-05-04T11:52:36+5:30
राज्यातील ३०७ गावांमधील २५००हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आसाम सरकारने दिली आहे.
नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 42 हजारांवर पोहचली आहे. तर आतापर्यत 1373 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र कोरोनाचं एक संकट असताना आणखी एक नवं संकट देशासमोर उभं राहिलं आहे.
देशात पहिल्यांदाच आफ्रिकी स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. आधीच कोरोनाचं संकट आणि आता आफ्रिकी स्वाईन फ्लू अशा दोन गंभीर आजारांचा भारतात शिरकाव झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 'आफ्रिकी स्वाईन फ्लू'मुळे आसाममध्ये २५००हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील ३०७ गावांमधील २५००हून अधिक डुक्करांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आसाम सरकारने दिली आहे. आसामधील पशुपालन आणि पशु चिकित्सक मंत्री अतुल बोरा यांनी सांगितलं की, केंद्र सरकारने डुक्करांना मारण्याची मंजुरी दिली आहे. परंतु राज्य सरकार त्यांना मारण्याऐवजी आफ्रिकी स्वाईन फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग शोधणार असल्याचे अतुल बोरा यांनी सांगतिले.
आफ्रिकी स्वाईन फ्लूचा कोरोना व्हायरसशी काहीही संबंध नाही. राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग संस्था (एनआयएचएसएडी) भोपाळने हा आफ्रिकी स्वाईन फ्लू (एएसएफ) असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच अशा प्रकरच्या फ्लूने भारतात प्रथमच प्रवेश केला असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरुच आहे. जगात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 35 लाख 65 हजार 310 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 48 हजार 565वर पोहोचली आहे. तसेच या व्हायरसपासून जगभरात 11 लाख 54 हजार रुग्ण बरे झाले आहेत.